नागपूर (Nagpur) : हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session)बाजारभावापेक्षा चार ते पाच पट अधिक रकमेने साहित्य खरेदी करण्याचा घातलेला घाट उधळण्यात आला आहे. साहित्य खरेदी अंगलट येण्याची शक्यता दिसताच सार्वजनिक बांधकाम विभागाने (PUBLIC WORKS DEPARTMENT) सर्व टेंडर (Tender) तातडीने रद्द केले आहेत.
पाच रुपयांचा मास्क (Mask) पंचवीस रुपयांना तर तीन हजार रुपये लिटरचे सॅनिटायजरचे (Sanitizer) कॅन नऊ हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याचे टेंडर काढण्यात आले होते. टेंडर रद्द झाल्यामुळे अधिवेशनात अधिकारी आणि कंत्राटदारांची मोठी कमाई करण्याची संधी हातून गेली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या नावावर कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते. रंगरंगोटीच नव्हे तर मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांसाठी कोट्यवधींचे साहित्य खरेदी केले जाते. त्यात छोट्या छोट्या वस्तुंचाही समावेश असतो. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी अधिवेशन कमाईची पर्वणीच असते.
अधिवेशन जवळ येताच कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकाऱ्यांच्या मागेपुढे घुटमळत असतात. कोरोनामुळे मागील अधिवेशन रद्द झाले होते. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनातून त्याची भरपाई करण्याचा नियोजन अधिकारी आणि कंत्राटदारांनी केले होते. सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपूर होणार आहे. त्यामुळे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागला. तब्बल ५० कोटींचा खर्च करण्याची तयारी दर्शवली. काही साहित्य खरेदीसाठी निविदाही बोलवण्यात आल्या होत्या.
कोरोना असल्याने मोठ्या प्रमाणात मास्क आणि सॅनिटायजर खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. बाजारात सर्जिकल मास्क पाच रुपयांना उपलब्ध आहे. मात्र तो २५ रुपयांना आणि तीन हजार रुपये लीटरचे सॅनिटायजर नऊ हजार रुपयांमध्ये खरेदी केले जाणार होते. बाजारात २० लीटर पाण्याची कॅन कुठेही ३० ते ४० रुपयाला उपलब्ध आहे. मात्र ती ९५ रुपयांमध्ये घेण्यात येणार होती. रविभवन, आमदार निवास, विधानभवन परिसर, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान अशा ठिकाणी दररोज सुमारे दीडशे कॅनचा पुरवठा करावा लागतो. याकरिता अधिकाऱ्यांनी निविदाही मंजूर केली होती. मात्र साहित्य खरेदीचे दर जाहीर होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पुन्हा भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झाली होती. प्रकरण अंगावर शेकेल याचा अंदाज येताच अधिकाऱ्यांनी लगेच टेंडर रद्द करून यातून अंग काढून टाकले.
मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ५० कोटींच्या शंभरपेक्षा अधिक टेंडर रद्द केले आहेत. यात देखभाल दुरुस्तीसह साहित्य खरेदीच्या टेंडरांचा समावेश आहे. टेंडर रद्द होताच कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे. येत्या सोमवारी नवीन दराने टेंडर मागवण्यात येणार असल्याचे सा.बा. विभागातील सूत्रांनी सांगितले. जे टेंडर रद्द झाले नाहीत त्यावरही बालंट येण्याची शक्यता असल्याने कंत्राटादारांनी कामे थांबविली आहेत.
टेंडरवर काही जणांनी आक्षेप घेतले होते. काही वस्तूंचे दर जास्त दर्शवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे साहित्य खरेदीचे टेंडर रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण असताना मास्क आणि सॅनिटायजरचे दर अधिक होते. आता मात्र तशी परिस्थिती नाही. त्यामुळे नव्याने टेंडर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक निर्माण विभाग