Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

धारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु; 'नैना'ची तिसरी मुंबई..

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : धारावी प्रकल्प (Dharavi Project) हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल. यासंदर्भात सर्व मजुंरी आणि टेंडरची कामे लवकरच मार्गी लागतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील जिओ कॅन्वेक्शन सेंटर येथे नरेड्को महाराष्ट्र होमेथॉन एक्पो 2022 चे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, मुंबईतील म्हाडा आणि एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. मुंबई हे आय-लॅण्ड शहर असून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, यासाठी मेट्रो, ट्रॉन्सहॉर्बर लिंक, कोस्टल रोड यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते आता पुढील वर्षाच्या शेवटी पूर्णत्वाकडे जाणार आहेत. नवी मुंबईतील विमानतळ जवळ नैना हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नैनाची तिसरी मुंबई म्हणून ओळख असणार आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या विकासक, गुंतवणुकदारांना शासनाकडून काही सवलती देण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलली जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच चांगला निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेड्कोला दिले.

मुंबईतील वाहतुकीसंदर्भातील सर्व पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे जात असून मुंबईच्या विकासाकरिता विकासकांच्या नवनवीन कल्पनांची आवश्यकता भासणार आहे. वित्तीय संस्था शासनाबरोबर काम करायला उत्सुक आहेत. यामुळे याचा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे. आपल्याला मुंबई ही राहण्याजोगी करण्याबरोबरच मुंबईतील लोकांच्या राहण्याचा दर्जाही वाढवायचा आहे. आम्ही सर्वप्रथम महारेरा कायदा आणला आणि तो यशस्वी झाला. महारेराने उद्योगांसाठी विश्वासाहर्ता आणली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते नाईट फ्रँक आणि नरेड्को यांच्या संयुक्त अहवालाचे तसेच *ओपन एकर्स* या मासिकाच्या मुखपृष्ठाचे विमोचन करण्यात आले. यावेळी नरेड्कोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांदेलकर, नरेड्को महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रूनवाल, नरेड्को महाराष्ट्रचे सचिव अभय चांडक आणि नाईट फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष शिशिर बैजल उपस्थित होते.