MIDC
MIDC Tendernama
टेंडर न्यूज

'त्या' एमआयडीसीच्या जागेच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : लातूर जिल्ह्यातील उदगीर ‘एमआयडीसी’साठी जागा अंतिम करण्यात आली असून त्याबाबतचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. आगामी आठवड्यात प्रस्तावाला मान्यता मिळून कामास गती देण्यात येईल, अशी माहिती मंत्रालयातील बैठकीत देण्यात आली.

यावेळी लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट तालुक्यात उद्योजकांची जमिनीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या दोन्ही ठिकाणी ‘एमआयडीसी’ निर्मितीसाठीच्या प्रस्तावाला गती द्यावी, असे निर्देश क्रीडा, युवक कल्याण व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.उदगीर ‘एमआयडीसी’साठी जागा अंतिम करण्यात आली असून प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात याला मान्यता मिळून कामास गती देण्यात येईल. त्याचबरोबर जळकोट येथे ‘एमआयडीसी’साठी पथकाने पाहणी केली आहे. याठिकाणी ‘एमआयडीसी’पर्यंतचा मुख्य रस्ता जिल्हा प्रशासन करून देईल. या दोन्ही एमआयडीसीची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना त्यांनी ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांना केल्या. जळकोट येथे मिनी एमआयडीसी उभारण्यास सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे.

लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा-2 सोबतच उदगीर, चाकूर येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. चाकूर एमआयडीसी निर्मितीसाठी 266 हेक्टरचा प्रस्ताव लवकरच उच्च स्तरीय समिती समोर मांडला जाणार आहे. लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा- 2 साठी 482 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही गतीने करण्यात येत आहे.

उदगीर हे लातूर जिल्ह्यातील एक व्यापारी शहर आहे. या शहरात एमआयडीसी स्थापना व्हावी, अशी येथील व्यापारी व जनतेची मागणी होती. शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. उदगीर औद्योगिक क्षेत्र स्थापना करण्यासाठी मौजे सुलढाणा, कासराळ व लिमगाव येथील १०८ हेक्टर क्षेत्रात मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. उदगीर एमआयडीसीच्या स्थापनेमुळे स्थानिक औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल. तसेच बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबतच स्थानिक व्यापाऱ्यांना कच्च्या मालाची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.