Vidhan Bhavan
Vidhan Bhavan Tendernama
टेंडर न्यूज

अखेर निधी मिळाला; नाशिकच्या आमदारांना पुरवणी मागण्यांमधून 850 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्य विधानसभेने या आठवड्यात ४१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली असून, त्यातून नाशिक जिल्हयातील आमदारांनी केलेल्या मागणीनुसार जवळपास साडेआठशे कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्या आहेत.

त्यात प्रामुख्याने रस्त्यांची कामे असून या शिवाय मध्यवर्ती कारागृहामध्ये इमारत, कर्मचारी निवासस्थाने, संरक्षक भिंत, निफाड येथील ग्रामीण रुग्णालयाची क्षमता १०० खाटा करणे, घोटी, हरसूल, गिरणारे येथील ग्रामीण रुग्णालये इमारती आदी प्रमुख कामांचा समावेश  आहे.विशेष म्हणजे या निधीपैकी ४४८ कोटी रुपयांचा निधी आदिवासी उपयोजनेतील कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. न्यायालय व आरोग्य विभाग वगळता इतर कामांच्या तुलनेत प्रस्तावित करण्यात आलेला निधी तुलनेने फारच कमी आहे.

नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे १५ व विधान परिषदेचे दोन असे १७ आमदार आहेत. या आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनपूर्वी या आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामधील कामे प्रस्तावित करण्यासाठी बांधकाम, आदिवासी विकास आदी विभागांना सूचना दिल्या. त्यानुसार या विभागांनी कामांच्या याद्या तयार करून त्या त्या विभागाकडे दिल्या होत्या. राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारमध्ये अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचाही एक गट सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही शेवटच्या टप्प्यात आणखी कामांची नावे समाविष्ट करून याद्या नव्याने पाठवल्या. त्यात अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार अर्थमंत्री झाल्यामुळे या पुरवणी मागण्यांमध्ये भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना चांगला निधी मिळाला आहे. आमदार हिरामन खोसकर काँग्रेसचे असले,तरी त्यांच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात घोटी,हरसूल या ग्रामीण रुग्णालयांना भरघोस निधी मिळाला आहे.

भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले यांच्या मतदारसंघात  प्रत्येकी अंदाजे ९० कोटींच्या आसपास निधी मिळाल्याचे विधिमंडळाने प्रकाशीत केलेल्या पुस्तिकेवरून दिसत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार असून त्यांनाही चांगला निधी मिळाला आहे. दरम्यान या सरकारमध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे दादा भुसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे दोघे कॅबिनेट मंत्री असूनही त्यांना त्यांना अनुक्रमे ३५ व ३६ कोटी रुपये निधी मिळाला आहे. शिवसेनेचेच आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या मागणीनुसार पुरवणी मागण्यांमधून नांदगावला ४० कोटींची कामे मंजूर झाली आहेत.  विधिमंडळाने पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केलेल्या आदिवासी उपयोजनेच्या निधीतून नाशिक जिल्ह्यातील ४४८ कामे मंजूर झालेली असल्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांना चांगला निधी मिळाला आहे.
 पुरवणी मागण्यांमधून मंजूर झालेल्या निधीतून नाशिक शहरात लॉन्सरोडचे सहापदरीकरण व काँक्रिटीकरणासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे कर्मचारी निवासस्थान, इमारत, संरक्षक भिंत यासाठी ३६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. निफाड येथील ग्रामीण रुग्णालय ५० खाटांवरून १०० खाटांचे करण्यासाठी ३८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच घोटी ग्रामीण रुग्णालयासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आशा
राष्ट्रवादी कॉग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर थोड्याच दिवसांत विधिमंडळ सुरू झाले. तोपर्यंत पुरवणी मागण्यांच्या याद्यांचे काम अतिम टप्प्यात होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सूचवलेली कामे मंत्रालयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. यामुळे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भाजप आमदारांच्या तुलनेत कमी निधी आहे. आता अर्थमंत्री अजित पवार असून पुरवणी मागण्यांमध्ये कमी निधी असला, तरी इतर विभागांकडील विशेष निधीतून कामे मंजूर करून घेण्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांचा भर असल्याचे दिसत आहे. यामुळे विधिमंडळ सुरू असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आणखी निधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.