Mumbai-Pune express way
Mumbai-Pune express way tendernama
टेंडर न्यूज

विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर एमएसआरडीसीला जाग; एक्स्प्रेस वेवर...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे मेगा एक्स्प्रेस वेवर लवकरच 'इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम' ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने याबाबतचे कार्यादेश जारी केले आहेत.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने एक्स्प्रेस वेवर 'इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (आयटीएमएस) बसविण्यास एमएसआरडीसीला मुहूर्त सापडला आहे.

यासंदर्भातील कार्यादेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. एक्स्प्रेस वेवर येत्या ९ महिन्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यानंतर महिनाभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येईल. म्हणजे वर्षभरात अत्याधुनिक आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित होईल. सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी सुमारे १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एक्स्प्रेस वेवर वाहतूक शिस्त पाळली जावी, अपघात टाळावे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच टोल वसुली जलद, अचूक, तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.