Solar park Tendernama
टेंडर न्यूज

५८० कोटींतून उभारणार पहिला तरंगता सोलर पार्क; लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : देशातील पहिला 105 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा पार्क महाराष्ट्रात उभा राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इराई धरणात महानिर्मितीने हे सोलर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 580 कोटींचे टेंडर लवकरच काढले जाणार आहे.

महानिर्मितीने चंद्रपूर येथील औष्णक वीजनिर्मिती केंद्राला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून इराई धरण बंधले आहे. या धराणातील विस्तीर्ण जलपृष्ठभागावर सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार असून त्याबाबतचा आढावा नुकताच ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला. यावेळी त्यांनी सौर ऊर्जा पार्क पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला. हे ऊर्जा पार्क उभारण्यासाठी लवकरच टेंडर काढले जाणार आहे. पुढील 15 महिन्यांत सौर प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे.

इराई धरणातील ऊर्जा पार्कचे पर्यटकांना अवलोकन करता यावे यासाठी गॅलरी व सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात वाघांचा व बिबट्यांचा वावर असल्याने कर्मचारी व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी महानिर्मितीला दिले. या बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.