Bullet Train
Bullet Train Tendernama
टेंडर न्यूज

Bullet Train मुहूर्त ठरला? 11000 कोटीच्या 24 जपानी गाड्यांची खरेदी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या महत्त्वकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी (Mumbai - Ahmadabad Bullet Train Project) शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित ११ हजार कोटी किंमतीच्या १० डब्यांच्या २४ गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनने यासंदर्भात टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू केली आहे.

देशातील या पहिल्या बुलेट ट्रेन मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या गुजरात राज्यातील वापी ते साबरमती या ३४९ किमी मार्गावर २०२७ पर्यंत पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किमीचा असून त्यासाठी १.८ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी संपूर्ण अर्थसहाय्य जपान इंटरनॅशनल काॅर्पोरेशन अर्थात 'जायका' करणार आहे. त्याबदल्यात 'जायका'ने मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी आवश्यक बुलेट ट्रेन जपान निर्मित असाव्यात, केवळ जपानी कंपन्यांना टेंडर प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी असेल, विशेषत: हिताची रेल आणि कावासाकी हेवी इंडस्ट्रिज अशा ट्रेनसेट्सची निर्मिती करणाऱ्या काही जपानी कंपन्याच असाव्यात अशी प्रमुख अट घातली आहे. त्यामुळे खरेदी केल्या जाणाऱ्या सर्व गाड्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित २४ ई-५ सिरीजच्या असणार आहेत. 

प्रत्येक शिंकानसेन ट्रेनसेटमध्ये १० डबे असतील आणि त्यांची ६९० प्रवासी इतकी आसन क्षमता असेल. भारतातील अतिउष्ण हवामान, धूळ, वादळवारा यांसारख्या भौगोलिक आणि वातावरणीय बदलानुसार या २४ गाड्यांमध्ये हवे ते बदल करून द्यावेत, अशी अट घालण्यात येणार आहे. शिवाय या डब्यात आधुनिक आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, लहान मुलांसाठी चेंजिंग रूम असणार आहे.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील महाराष्ट्रातील काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रात सर्वांत मोठा टप्पा असलेल्या पॅकेज-३ मधील ठाणे जिल्ह्यातील शीळफाटा ते पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेपर्यंतच्या झरोली हा १३५.४५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कंत्राट एल ॲन्ड टी (L&T) कंपनीला नुकतेच देण्यात आले आहे. एल ॲन्ड टी कंपनीचे टेंडर १५,६९७ कोटींचे असून या बांधकामांत या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश आहे.

ठाणे खाडीसह बीकेसी ते शीळफाटा दरम्यानच्या २१ किमीच्या देशातील समुद्राखालील पहिल्या बोगद्याचे काम ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्स ६३९७ कोटी खर्चून करणार आहे. हा बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे.

मुंबईतील बीकेसी येथील भूमीगत स्थानकाची एमएईआयएल-एचसीसी कंपनीचे ३६८१ कोटींचे टेंडर मंजूर केल्यानंतर या भूमीगत स्थानकाचे काम सुरू झाले आहे. ४.९ हेक्टरवर हे स्थानक तीन मजली असून यात फलाटांची लांबी ४१४ मीटर असून येथून १६ काेचची बुलेट ट्रेन ये-जा करू शकेल. तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याच्या भारोडी आणि अंजूर गावाजवळील ६० हेक्टर जमिनीवर बुलेट ट्रेन डेपो बांधण्याची टेंडर प्रक्रिया सध्या सुरू आहे.