मुंबई (Mumbai): मरिन ड्राइव्ह आणि नरिमन पॉइंटला जाण्यासाठी ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह असा ट्विन टनेल (भुयारी) मार्ग बांधला जाणार आहे.
या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून म्हणजेच एमएमआरडीएकडून येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 9158 कोटी रुपये इतका आहे. हा मार्ग 9.23 किमी लांबीचा असून, त्यातील बोगद्यांची लांबी 6.52 किमी असेल. या मार्गावर दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी 3 लेनची उभारणी केली जाणार आहे.
मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवरून येणाऱ्या वाहनांना थेट मरिन ड्राइव्ह आणि नरिमन पॉइंटला जाण्यासाठी हा नवा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी नुकतेच हा बोगदा खोदला जाणार असलेल्या ठिकाणी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) दाखल झालं आहे. सध्या या मशीनच्या दुरुस्तीचे काम सुरू असून चाचणी झाल्यावर बोगदा खोदण्याचं काम सुरू होईल. टीबीएमची फॅक्टरी अॅक्सेप्टन्स टेस्ट सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे.
एमएमआरडीएकडून ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह, असा ट्विन टनेल बांधला जात आहे. या मार्गाची जोडणी पुढे कोस्टल रोडला दिली जाणार आहे. हा मार्ग 9.23 किमी लांबीचा असून, त्यातील बोगद्यांची लांबी 6.52 किमी असेल. या मार्गावर दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी 3 लेनची उभारणी केली जाणार आहे. तसेच आपत्कालीन लेनही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
एमएमआरडीए या प्रकल्पासाठी कोस्टल रोडच्या कामासाठी वापरलेले टीबीएम वापरणार आहे. सध्या टीबीएमच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. एमएमआरडीएने 29 जूनपासून हे काम सुरू केले होते.
आता याची जवळपास कामे पूर्ण झाली असून, ऑगस्टच्या मध्यापर्यंत उर्वरित कामे पूर्ण होतील. त्यानंतर या टीबीएमची पुन्हा जुळणी केली जाणार आहे. भुयारीकरणासाठी उभारलेल्या शॉफ्टमध्ये सप्टेंबरमध्ये हे टीबीएम उतरविले जाईल.
मुंबई पोर्ट अथॉरिटीची जमीन मिळण्यासाठी विलंब लागल्याने या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले होते. एमएमआरडीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आता ही जमीन एमएमआरडीएला दिल्याने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.