<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>

Ajit Pawar

 

Tendernama

टेंडर न्यूज

पुणे, पिंपरीच्या वाहतूक प्रश्नावर अजितदादांचा रामबाण उपाय

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रिंगरोड मार्गी लागण्याच्या दृष्टीने शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्‍चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता. भोर ) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्‍यातून जाणार आहे. तर पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरवात होणार असून, हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे.

भूसंपादनासाठी रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गिकिच्या मोजणीच्या कामाला २१ एप्रिल २०२१ रोजी सुरवात करण्यात आली. एकूण ३७ गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे. गावातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडसाठी ६९५ हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. दरम्यान, या रिंगरोडसाठी भूसंपादन सुरू करण्याबाबतचे आदेश जानेवारीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव सदाशिव साळुखे यांनी काढले होते. त्यानुसार कोणत्या गावातील किती क्षेत्र या रिंगरोडमध्ये जाणार आहे, याची माहितीदेखील देण्यात आली आहे तर त्याच महिन्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक झाली होती. त्यात एमएसआरडीसी रिंगरोडच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

त्यावेळी पवार यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या अधिवेशनात रिंगरोड आणि कोकण किनारपट्टी रेवस रेड्डी मार्गाच्या भूसंपादनासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ती ३१ मार्च अखेर खर्ची टाकण्याचे आदेश एमएसआरडीसी आणि जिल्हाधिकारी यांना दिले होते. प्रत्यक्षात मात्र निधी आला नव्हता. परंतु जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादनाचे दर निश्‍चित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

रिंगरोडची वैशिष्टे

-पश्‍चिम भागातील चार तालुक्यातील ३७ गावातून जाणार

-६९५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन

-मोजणीच्या कामाला २१ जुलै रोजी सुरवात

- रिंगरोडच्या मोजणीचे काम पूर्ण

-भूसंपादनाचे दर निश्‍चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात

-समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भूसंपादन करणार

-स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

या गावातून जाणार रिंगरोड

भोर तालुका : केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे

हवेली तालुका : रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी ब्रुद्रुक, सांगरूण, बहुली.

मुळशी तालुका : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी.

मावळ तालुका : पाचणे, चांदखेड, बेबडओहोळे, धामणे, परंदवाडी उर्से