नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळा कामाशी संबंधित टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून कोणाचीही बाजू घेऊन कामे दिली जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचवेळी स्थानिक राजकीय नेत्यांनी टेंडर कोणाला मिळाले यात लक्ष घालू नका, अशा शब्दांत त्यांनी टेंडर प्रक्रियेबाबत तक्रारी करणाऱ्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
गेले अनेक महिन्यांपासून सिंहस्थ कामांच्या टेंडरमधील चुका शोधून त्याची जाहीर वाच्यता करून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप व शिवसेना या सत्ताधारी पक्षाचे स्थानिक नेते करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्यातून त्यांना जाहीरपणे समज दिली आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यातील जवळपास ५७०० कोटी रुपयांच्या ४४ कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात झाले. त्यानंतरच्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाचा कुंभ असून त्यासाठी आतापर्यंत २० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून सिंहस्थापर्यंत ही कामे २५ हजार कोटींपर्यंत जातील. या सिंहस्थात होणारी कामे ही पुढील २५ वर्षांपर्यंत टिकतील, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी या कामांमुळे आधुनिक नाशिकची निर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सिंहस्थाशी संबंधित सर्व प्रमुख विकासकामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करताना ती गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रिमोट कंट्रोलद्वारे प्रस्तावित विकासकामांचे भूमीपूजन केले. यामध्ये ३ हजार ३८७ कोटीची विकासकामे ही महापालिका हद्दीमधील आहेत. त्यामध्ये रामकाल पथ, पाणीपुरवठा योजना, मलनि:स्सारण प्रकल्प, स्वच्छता, शहरात ३०११ सीसीटीव्ही, पुरातन मंदिरांचे पुनर्जीवन, शहरातील पूल, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे अशा विविध २८ कामांचा समावेश आहे.
तसेच भूमीपूजन सोहळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन हजार २७० कोटी रुपयांच्या १७ कामांचा समावेश आहे. त्यामध्ये नाशिक - त्र्यंबकेश्वर सहापदरी रस्त्यासह नाशिक शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण तसेच प्रमुख राज्यमार्गाच्या कामांचा समावेश आहे.