Chandani Chowk
Chandani Chowk Tendernama
टेंडर न्यूज

Pune : अखेर चांदणी चौकाचा बदलला चेहरा-मोहरा; 50 वर्षांचा विचार करून...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आठ रॅम्प, दोन अंडरपास, चार पूल, दोन सेवारस्ते असे मिळून सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांनी चांदणी चौकाचा चेहरा-मोहरा बदलला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ३९७ कोटी रुपये खर्चून पुढील ५० वर्षांचा विचार करून प्रकल्प साकारला आहे. पूर्वी ३० ते ३५ हजार वाहनांची क्षमता असणाऱ्या मार्गावर आता दिवसाला दीड लाख वाहने सुसाट धावतील. नूतनीकरण केलेल्या चांदणी चौकाचे उद्‍घाटन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते होणार आहे.

पूर्वीचा चांदणी चौक

- मुंबईहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन

- साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन

- मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन

- बावधन, मुळशी व एनडीएहून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन

- बावधकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती

- परिसरातील रहिवाशांना घरी किंवा बाहेर जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागत असे

- परिणामी मुख्य मार्गावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत

आठ रॅम्पने बदलला चेहरा-मोहरा

रॅम्प-१ (मुळशी रस्त्यावरून सातारा/कोथरूडकडे जाण्यासाठी)

रॅम्प-२ (मुळशी रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी)

रॅम्प-३ (मुळशी रस्त्यावरून बावधन/पाषाणकडे जाण्यासाठी)

रॅम्प-४ (कोथरूड/सातारा रस्त्यावरून मुळशीकडे जाण्यासाठी)

रॅम्प-५ (एनडीए/बावधन रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी)

रॅम्प-६ (पाषाण/बावधन रस्त्यावरून सातारा/कात्रजकडे जाण्यासाठी)

रॅम्प-७ (सातारा/कोथरूड रस्त्यावरून पाषाण/बावधनकडे जाण्यासाठी)

रॅम्प-८ (सातारा/कोल्हापूर रस्त्यावरून मुळशी/पाषाण/बावधनकडे जाण्यासाठी)

हा बदल महत्त्वाचा

- मुंबई-सातारा मार्ग पूर्वी दोन लेनचा, आता तीन लेनचा

- सातारा-मुंबई मार्ग पूर्वी दोन लेनचा, आता तीन लेनचा

- मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने दोन सेवारस्ते

फायदा काय?

- परिसरातील नागरिकांना आता मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागणार नाही

- मुख्य रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल

- मुख्य रस्त्यावर परिसरातील वाहनांची संख्या कमी होईल

- मुळशी, कोथरूड, बावधन आदी भागांतून येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज नाही

- दिवसाला दीड लाख वाहने सहजपणे धावू शकतील अशी रस्त्याची रचना

- पुढील ५० वर्षांचा विचार करून मार्गाचे काम केल्यामुळे वाहनांची संख्या वाढली तरी कोंडी होणार नाही

पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम अखेर सहा वर्षानंतर पूर्ण झाले आहे. मुंबई-बंगळूर महामार्गावर चांदणी चौक येथे वाहतूक कोंडी होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे २०१७ मध्ये आठ मार्गिका असलेल्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. भूसंपादनातील अडचणी, कोरोना या कारणामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास सहा वर्षे लागले. हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी नितीन गडकरी यांनी अनेकदा आढावा बैठका घेतल्या. शिवाय तीन वेळा प्रत्यक्ष कामाची पाहणी केली होती. अखेर ८६५ कोटी रुपये खर्च करून १६.९६ किलोमीटर लांबीच्या आठ मार्गिका असलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण उद्या होत आहे. त्यामुळे या चौकाची वाहतूक कोंडीची सुटका होणार आहे. तसेच ४९५ कोटी रुपये खर्च करून खेड-मंचर हा १४.३८ किलोमीटरचा रस्ता बांधला आहे, त्याचेही लोकार्पण यावेळी होईल.

‘भाजप’मधील वाद चव्हाट्यावर

चांदणी चौकाचे लोकार्पण होण्याच्या एक दिवस आधी कोथरूड मतदारसंघातील ‘भाजप’मधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांना या कार्यक्रमातून डावलले जात असल्याचे नमूद करत ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयात सहभागी नव्हते, तेव्हापासून माझा पाठपुरावा सुरू होता. पण आता ते त्यांच्या एकट्याचेच श्रेय आहे असे वागत आहेत. मी राष्ट्रीय पदावर कार्यरत असतानाही मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमांचे पास विनंती करूनही देण्यात आला नाही, असा आरोपही या पोस्टमध्ये केला आहे. कुलकर्णी यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यावरून भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

काँक्रिट : ८३,००० क्यूबिक मीटर

स्टील : ५,७५० मेट्रिक टन

कामगार : ३००

अधिकारी : १००

कामाचा कालावधी : फेब्रुवारी २०१९ ते १२ ऑगस्ट २०२३

मोठा पूल ः लांबी १५० मीटर, रुंदी ३२ मीटर

मुख्य रस्त्यावर : नऊ मोठे गर्डर

सेवा व अन्य रस्त्यांसाठी : ३३ छोटे गर्डर

प्रकल्पाचा खर्च : ३९७ कोटी

दिवसाला : दीड लाख वाहने धावण्याची क्षमता

वाहतुकीसाठी : शिव सिक्युरिटी यांच्या ३३ वार्डनची नेमणूक

‘‘पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो, ई-बस, रिंगरोड हा त्याचाच एक भाग आहे. चांदणी चौक प्रकल्पामुळे पुण्याच्या पश्चिमेला होणारी कोंडी कायमस्वरूपी सुटेल. पुण्याच्या वैभवात भर घालणारा प्रकल्प आहे. त्यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला याचा आनंद आहे.’’

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री