5G Spectrum
5G Spectrum Tendernama
टेंडर न्यूज

अदानी, अंबानींची लिलावात '5Gच्या स्पीड'ने बोली; मोदी आता...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : देशातील ५-जी स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या पहिल्याच दिवशी, मंगळवारी सरकारला अपेक्षा होती त्याहून अधिक रकमेची बोली लावण्यात आली. मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल आणि गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांनी ५-जी स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभाग घेत सर्वाधिक बोली लावली आहे. (5G Spectrum Auction Updates)

या लिलाव प्रक्रियेत एकूण चार कंपन्यांनी सहभाग घेतला असून, त्यात अंबानी यांची रिलायन्स जिओ, मित्तल यांची भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी समूहाच्या कंपनीचा समावेश आहे. ५-जीच्या आगमनानंतर देशातील दूरसंचार क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

देशात ५ जी सेवा चालू वर्षीच्या अखेरपर्यंत सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. तसेच, १४ ऑगस्ट पर्यंत ५-जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लिलावाच्या पहिल्याच दिवशी १.४५ लाख कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. ही रक्कम सरकारच्या अपेक्षेहून अधिक असून, तिने २०१५च्या विक्रमालाही मागे टाकले आहे. पहिल्या दिवशी लिलावाच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. मध्यम आणि उच्च बॅंडमध्ये कंपन्यांनी अधिक रुची दाखविली आहे. लिलावात सहभागी झालेल्या कंपन्यांनी ३३०० मेगाहर्टझ आणि २६ गीगाहर्टझ बॅंडसाठी सर्वाधिक बोली लावली आहे.

५-जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया आज बुधवारीही सुरू राहणार आहे. ५-जी सेवेच्या आगमनानंतर देशातील इंटरनेटच्या वापरामध्ये क्रांतीकारी बदलांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इंटरनेटचा वेग वाढल्याने वापरही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याच बरोबर अत्याधुनिक सेवा नागरिकांना एका क्षणात उपलब्ध होऊ शकणार आहेत.