Yavatmal
Yavatmal Tendernama
विदर्भ

Yavatmal : अर्धवट महामार्ग 4 वर्षांपासून ठरतोय मृत्यूचा मार्ग

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाने अनेक प्रवाशांची सुविधा झाली. मात्र, महागाव ते वारंगादरम्यान या महामार्गाचे काम चार वर्षांपासून रखडले आहे. त्यातच मुडाणा गावानजीक रस्त्यासाठी डोंगर फोडून तयार केलेला खड्डा चार वर्षांपासून तसाच आहे. हा खड्डा रोजच्या अपघातांसाठी कारणीभूत ठरत असून, येथे अनेकांचा जीव गेला आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे हे अर्धवट बांधकाम आता गावकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. लोकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी मुडाणा येथील गावकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर थातूरमातूर पद्धतीने रस्ता बनवला गेला. नंतर काम जैसे थे झाले आहे.

महागाव ते उमरखेडदरम्यानच्या घाटामध्ये भलामोठा खड्डा करून ठेवण्यातआला आहे. या घाटातून जाताना अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. तरीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष पडत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. हा घाट नागमोडी येथे अपघातांची मालिका सुरू आहे. तरीही कुठलीही सुधारणा केल्या जात नाही. रात्री बेरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांसाठी हा खड्डा आणि घाट भीतिदायक ठरत आहे.

या घाटाचा आधार घेऊन येथे सागवान तस्करीसुद्धा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महागाव आणि उमरखेड पोलिसांसाठी ही मोठी डोकेदुखी बनली आहे. मुडाणा येथे झिरो पॉइंटला वळणरस्त्यावर किरकोळ अपघात रोज होत आहेत. रोज एखाद्या जखमीला खासगी दवाखान्यात नेण्याची वेळ येत मुड आहे.

मुडाणा येथे बसस्टॉपजवळ अपघातांची मालिका सुरू आहे. महामार्गाच्या अर्धवट कामामुळे मुडाणावासी त्रस्त आहेत. त्यामुळे आता मुडाणा ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात गावकरी आहेत. सरपंच, उपसरपंच यांच्या पुढाकारात आंदोलन केले जाईल, असे राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस कपिल जाधव यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षांपासून मुडाना गावातील अर्धवट उड्डाणपुलामुळेही गावकरी त्रस्त झाले व आहे. या उड्डाणपुलामुळे पावसाळ्यात न नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसून मोठे नुकसान होते. या वर्षीही जुलै महिन्यात नागरिकांचे नुकसान झाले फक्त प्रशासनाने थातूरमातूर उपाययोजना केल्या.

शासन आपल्या दारी उपक्रमातही उपेक्षा

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील महागाव ते वारंगा या अंतरातील बांधकाम रखडलेले आहे. त्यातच मुडाणा गावानजीक उड्डाणपूल अर्धवट असल्याने गावकऱ्यांना अपघातासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन आपल्या दारी हा उपक्रम येथे राबविला गेला. त्यावेळी खुद्द तत्कालिन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यापुढे मुडाणावासीयांनी उड्डाणपुलाचा तसेच अर्धवट महामार्गाचा प्रश्न मांडला. त्यांनी एसडीओंना सूचना दिली होती.

मात्र स्थानिक प्रशासनाने केवळ तीन पाईप टाकण्यापुरती थातूरमातूर कार्यवाही केली. परंतु आता महामार्गासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यामुळेही अपघातांची मालिका सुरू झाली आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी मुडाणा येथील नागरिक करीत आहे.