Yavatmal
Yavatmal Tendernama
विदर्भ

Yavatmal : अखेर डेक्कन डिस्टलरी कंपनीविरोधात गुन्हा दाखल; काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : अधर पूस प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात विषारी केमिकल सोडल्याच्या आरोपावरून डेक्कन डिस्टलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गुंज विरुद्ध महागाव पोलिसांत अखेर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर काळुराम कांबळे लिपिक, कार्यालय अभियंता पाटबंधारे शाखा वेणी कॅम्प सवना यांनी फिर्याद दिली. त्यावरून महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, सह 277, 269, 279, 284 भा.दं. वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

15 मार्च रोजी सकाळी साडेअकरा ते 20 मार्च रोजीचे रात्री 7 वाजेपावेतो प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची पाहणी करीत असताना डेक्कन डिस्टलरी शुगर लिमिटेड म. गुंज कंपनीच्या टँकरने केमिकलयुक्त दूषित पाणी अधर पूस प्रकल्पाच्या मुख्य कालव्यामधून सोडल्याची बाब कालवा निरीक्षकाच्या निदर्शनास आली होती. दूषित पाण्यामुळे प्रकल्पाच्या पाण्याची योग्यता कमी झाली. तसेच गुराढोरांस, तसेच मानवी आरोग्यास अपायकारक होईल अशा प्रकारचे नुकसान केल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे.

डेक्कन डिस्टलरी या प्रायव्हेट कारखान्यांमध्ये पेंट वॉश हे दूषित रसायन नष्ट करण्याकरिता विशिष्ट प्रयोजन करण्यात आले आहे; परंतु नेहमीप्रमाणे पेंट वॉश शेतामध्ये किंवा कालव्यात सोडून दिले जाते. यामुळे परिसरातील नाले, विहिरीचे पाणी दूषित होऊन नागरिकांसह जनावरांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. 

अधर पूस प्रकल्प कार्यालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कंपनीविरुद्ध फिर्याद दिली; मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर याप्रकरणी कोणतीही कारवाई न करता चुप्पी साधून असल्याने त्यांच्या या भूमिकेबाबत नागरिकातून संशय व्यक्त होत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार संशयास्पद : 

प्रकल्प कार्यालयाचे उप-विभागीय अधिकारी अविनाश भगत यांनी दखल घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे शेतकऱ्यांमधून कंपनीविरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त करण्यात येत होता. तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढता दबाव पाहता 26 मार्च रोजी पोलिसांनी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.