Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : म्हाडाच्या वसाहतींची दुरावस्था; कधीही होऊ शकते अपघात

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) शहरात ३० वर्षांहून अधिक जुन्या वसाहती असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. या वसाहती पाडून नव्याने उभारण्याची गरज आहे. यात केव्हाही भीषण अपघात होऊ शकतो. जुन्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी म्हाडा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वसाहतीतील नागरिक करत आहेत. याबाबत म्हाडाचे म्हणणे आहे की, प्रस्ताव मांडल्यानंतर नवनिर्माण केले जाईल.

२८८ आहेत फ्लॅट्स 

म्हाडा प्रशासनानूसार जोपर्यंत नूतनीकरणाचा प्रस्ताव रहिवाशांच्या संघटनेने मांडला नाही तोपर्यंत जुन्या वसाहतींचे नूतनीकरण करता येणार नाही. या वसाहतींमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना ठराविक कालावधीसाठी फ्लॅटचे वाटप करण्यात आले आहे. भाडेतत्त्वाची मुदत संपल्यानंतर वसाहतींचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी म्हाडाची आहे. दुसरीकडे म्हाडाचे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेषत: सिव्हिल लाईन्समध्ये असलेल्या म्हाडाच्या कार्यालयाला लागून असलेल्या म्हाडाच्या प्रियदर्शनी नगरमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत. म्हाडाने १९ नोव्हेंबर १९८७ रोजी येथे २८८ फ्लॅट्स असलेल्या एकूण ३६ इमारती बांधल्या. सुमारे ३५ वर्षे जुन्या असलेल्या या इमारती आता जीर्ण झाल्या आहेत.

प्रस्ताव मिळाल्यास काम करणार

जुन्या वसाहतींचे नूतनीकरण करण्यासाठी रहिवाशांच्या संघटनेने खासगी वास्तुविशारदाच्या मदतीने ‘प्लॅन’ सादर करावा असा प्रस्ताव आल्यानंतर म्हाडा नूतनीकरणाचा निर्णय घेऊ शकते.  खासगी विकासकांमार्फतही संस्थेला नूतनीकरण करता येते. आम्हाला असे दोन प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यात त्रिमूर्ती नगर आणि काचीपुरा म्हाडा कॉलनीचा समावेश आहे. या वसाहतींचे नूतनीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती भाग्यश्री टांक, वास्तुविशारद विभाग, म्हाडा यांनी दिली.

नूतनीकरणाचा प्रयत्न अयशस्वी

प्रियदर्शनीनगरातील इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचा प्रस्ताव अनेकवेळा तयार करण्यात आला, मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सदनिकाधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतनीकरणासाठी खासगी विकासकांशी संपर्क साधला होता, मात्र दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य नसल्याने हा प्रस्ताव रखडला. इतर वसाहतींमध्येही हीच परिस्थिती आहे. अन्य एका प्रकरणात म्हाडाच्या जुन्या इमारती पाडून त्रिमूर्तीनगर आणि काचीपुरा येथे नवीन इमारती बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्रिमूर्ती नगरमध्ये ४४ फ्लॅटची कॉलनी आहे आणि काचीपुरा येथे २४ फ्लॅटची कॉलनी आहे. या वसाहती पाडून नव्याने उभारल्या जातील.