Science Lab
Science Lab Tendernama
विदर्भ

नागपुरातील शाळांमधील 'सायन्स लॅब' का बनल्या उपयोग शून्य?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शालेय विद्यार्थ्यांमध्ये कुतुहूल निर्माण व्हावे, तसेच विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत गटसाधन केंद्रांतर्गत नागपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ७५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून नावीण्यपूर्ण विज्ञान केंद्र (सायन्स लॅब) उभारण्यात आले आहे. मात्र या विज्ञान केंद्रांतील साहित्यांचा उपयोग होत नसल्याने ते धुळखात पडून आहे. दुसरीकडे आणखी एक कोटी पाच लाखांचे साहित्य खरेदी करण्याचे टेंडर काढण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदेच्या, तसेच आश्रमशाळा आणि महापालिकेच्या शाळांमध्ये हे विज्ञान केंद्र (सायन्स लॅब) उभारण्यात आली आहेत. अनेकदा दर्जेदार प्रयोगशाळे अभावी या शाळांमधील विद्यार्थ्यांना आवड व इच्छा असतानाही विज्ञान विषयातील विविध प्रयोग करण्यापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांमध्ये ही सायन्स लॅब उभारून देण्यात आली आहे. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले. इयत्ता ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना प्रयोगातून विज्ञान शिकण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार, असा यामागील उद्देश होता.

यू-डायसमधील पटसंख्येच्या आधारावर शासनाने राज्य स्तरावरून परस्पर शाळांची निवड केली आणि परस्पर केंद्रासाठी साहित्य पाठविले. परंतु पूर्वी निवड करण्यात आलेल्या जि.प.च्या २३ शाळांमध्ये विज्ञान केंद्रासाठी वर्गखोलीच उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिथे विज्ञानाचे साहित्य कोंबून ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. तर ज्या ठिकाणी जागा आहे, अशा ठिकाणी ते साहित्य उपयोगात नसून, ते आता धुळखात पडले आहे. तर अनेक शाळांमध्ये तर वीज पुरवठा नसतानाही विज्ञान केंद्र देण्यात आले.

त्रुटी कायम
विज्ञानाचे केंद्राचे साहित्य शाळेत पाठविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला त्याच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शिक्षण विभागाने विज्ञान केंद्राच्या त्रुटीचा अहवाल दिल्यानंतरही त्यात सुधारणा करण्यात आल्या नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोट्यवधी रुपये खर्चून साकारलेले विज्ञान केंद्र आज उपयोगात नाहीत. त्यामुळे शासनाचे उद्दिष्ट हे त्या विज्ञान केंद्राप्रमाणेच आज धुळीस मिळाल्याची चर्चा रंगली आहे.