Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

गोखले पुलाच्या विलंबाला जबाबदार कोण? फडणवीसांचे चौकशीचे आश्वासन

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मुंबईतील अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला विलंब का झाला याची चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिले. तर प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मुंबईतील सर्व पुलांचे कालबद्ध वेळेत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल, असे जाहीर केले.

धोकादायक म्हणून जाहीर केलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल पुनर्बांधणीच्या कामासाठी ७ नोव्हेंबर २०२२ पासून संपूर्णतः बंद करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत भाजपचे सदस्य सुनील राणे यांनी लक्षवेधी सूचना केली होती.
या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी राज्यातील विविध विकास कामे गतीने व्हावीत, यासाठी सीएम वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या कामांवरही या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार असल्याने विकास कामे करताना विलंब होणार नसल्याचे सांगितले. तसेच मुंबई शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाची आवश्यकतेनुसार चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी घोषित केले.

तर सर्व पुलांचे ऑडिट...
तर गोखले पूल बंद करण्यात आल्याने नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागते ही वस्तुस्थिती आहे. या पुलाचे काम रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी ८२ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. यापैकी १७ कोटी रेल्वेला देण्यात आले आहेत, असे उदय सामंत यांनी सांगितले.
या पुलाचे काम तीन टप्प्यात होणार आहे. गोखले पुलाची पहिली मार्गिका मार्च २०२३ पर्यंत तर दुसरी मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत चालू केली जाणार आहे. महानगरपालिका या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. या पुलाचे काम का प्रलंबित होते याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल, असेही सामंत म्हणाले.

मुंबईतील जनतेची सुरक्षा महत्त्वाची असून, वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी परिवहन विभागाला सूचना करण्यात येईल. तसेच याबाबत परिवहन आणि महानगरपालिका तसेच संबंधीत विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. उर्वरित पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून काम पूर्ण केले जाईल, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे-शेलार यांच्यात सामना...
दरम्यान, या लक्षवेधी चर्चेच्या निमित्ताने शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि भाजपचे आशीष शेलार यांच्यात आरोप- प्रत्यारोपाचा सामना रंगला. कुणाच्या पत्रामुळे अथवा राजकीय दबावामुळे  महापालिका आयुक्तांनी गोखले पूल बंद केला, असा सवाल करताना आदित्य ठाकरे यांनी या पुलाच्या बांधकामात स्टील आणि डांबरचा घोळ होणार नाही, हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचा टोला लगावला.
त्यावर आशीष शेलार यांनी या प्रश्नाचे राजकारण करण्यात येत असल्याचे सांगत मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले, याची चौकशी करा, अशी मागणी केली. हा पूल धोकादायक झाल्याचे प्रशासन सांगते तेव्हा त्याची पुनर्बांधणी करा अशी मागणी करणारे पत्र स्थानिक आमदार म्हणून अमित साटम यांनी दिले असेल, तर त्याची कसली चौकशी करणार, असा सवाल करत शेलार यांनी चौकशीच करायची असेल तर गेल्या २५ वर्षांत झालेल्या डांबरी रस्त्यांमध्ये आणि पुलांच्या डांबरीकरणाची चौकशी करा. मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचा डांबर कोणी खाल्ले, कोल्ड मिक्स आणि हॉटमिक्स याची चौकशी करा, अशी मागणी आशीष शेलार यांनी केली.