PWD
PWD Tendernama
विदर्भ

भिंत पडली अन् PWDच्या 'त्या' अभियंत्याची झटक्यात बदली झाली

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : एका आयपीएस (IAS) अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्याची भिंत पडली ती दुरुस्त करण्यास बरेच दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) टाळाटाळ सुरू होती. त्यातच एका उपअभियंत्याची बदली झाली. तशा या दोन घटना वेगळ्या, परस्पराशी काही संबंध नाही. तरीही या बदलीची चांगलीच चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात रंगली आहे.

ज्या अभियंत्याची बदली झाली ते ठेकेदार प्रिय आहेत. त्यांच्याकडे आमदार निवास, शासकीय बंगल्याची देखभाल दुरुस्ती आणि वसंतराव देशपांडे सभागृहाचा पदभार होता. आमदार निवासात वर्षभर कामे सुरू असतात. त्यामुळे ठेकेदारांचा राबता असतो. आमदार निवासाच्या कधी खुर्च्या तुटतात तर कधी बेसिन. त्यामुळे कामेच कामे येथे सुरू असतात. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कामांसाठी फारसे डोके लावावे लागत नाही. एकूणच उपअभियंत्याचेही रोजच 'खिसे गरम' होत असतात. त्यामुळे येथून जाण्यास कोणी फारसे इच्छुक नसतात. प्रसिद्धीच्या झोतातही कोणी येत नाही. 'तेरी भी चुप आणि मेरी भी चूप' असा कारभार येथे सुरू असतो.

सर्व काही सुरळीत सुरू असताना एका आयपीएस अधिकाऱ्याच्या बंगल्याची सुरक्षा भिंत पडली. त्याने पीडब्ल्यूडी विभागाकडे अनेकदा निवेदन दिले, सूचना केल्या. मात्र फाईल पुढे सरकत नव्हती. कधी निधी नाही, तर कधी मंजुरी नाही, अशी नेहमीची कारणे दिली जात होती. संबंधित आयपीएस अधिकारी पूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) होता. तेव्हा त्यांची कामे पीडब्ल्यूडीचे अधिकारी झटपट करायचे. फक्त तोंडी सूचनेवरही कामे होत होती. मात्र अधिकाऱ्याची पोस्टींग बदलल्यापासून पीडब्ल्यूडीची टाळाटाळ सुरू होती. शेवटी आयपीएस अधिकाऱ्याने संबंधित अभियंत्याला चांगलाच दम दिला. त्यानंतर पीडब्ल्यूडीने एका ठेकेदाराला आदेश देऊन काम करून घेतले. ते होताच अभियंत्याची बदली झाली.

या दरम्यान आमदार निवास, शासकीय बंगल्याची जबादारी असलेल्या अभियंत्याची पीडब्ल्यूडीच्या झोन-४ मध्ये बदली झाली. आता आपल्याकडे दोन्ही पदाभार राहील अशी अपेक्षा त्याची होती. मात्र कोणी तरी काडी केली आणि आमदार निवास व शासकीय बंगल्याचा चार्ज काढून घेण्यात आला. यामागे बांधकाम विभागातील अभियंत्यामधील आपसातील स्पर्धा आणि आयपीएस अधिकऱ्याने दिलेला दम कारणीभूत असल्याचे बोलले जाते.