नागपूर (Nagpur) : कोतवाली चौक ते गंगाबाई घाटापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात येत असल्याने हा मार्ग तब्बल चार महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आधीच अरुंद आणि वर्दळीच्या या रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनःस्ताप होणार आहे.
महानगरपालिकेच्या सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील पॅकेज १५ अंतर्गत कोतवाली चौक ते झेंडा चौक व माणिपूरा चौक ते गंगाबाई घाटापर्यंत सिमेंट रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्यांचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तोपर्यत अर्थात चार महिने हा मार्ग बंद राहणार आहे. याबाबत आयुक्तांनी वाहतूक वळविण्याचे आदेश झोन कार्यालय, वाहतूक पोलिसांना दिले आहे. या रस्त्यावरील वाहतूक झेंडा चौक ते सक्करदरा मार्गाने सुरू राहील. इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्याचे मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळकपणे नागरिकांसाठी सूचना फलक लावणे, रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता आवश्यक सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला करण्याचेही आदेश दिले आहे.