<div class="paragraphs"><p>Roads</p></div>

Roads

 

Tendernama

विदर्भ

निवडणूक येताच सत्ताधारी-विरोधकांत दिलजमाई; रस्त्यांसाठी 'टेंडर'

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : पालिकेत सत्ताधारी-विरोधकांत सुरू असलेल्या राजकीय खेळामुळे शहरातील रस्त्यांची ‘वाट’ लागली होती. मात्र, आता निवडणुका जवळ येताच एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्यांना आता विकासकामांची आठवण झाली आहे. त्यामुळे स्थानिक आमदार निधी, नगरोत्थान, दलितवस्ती, दलितेत्तर अशा विविध योजनामधून शहरात जवळपास ११ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे होणार आहेत. या कामांचे टेंडर निघाले असून, कामांना सुरुवात झाली आहे.

यवतमाळ पालिकेत गेल्या पाच वर्षांपासून नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक असा थेट सामना सुरू आहे. त्यांचा परिणाम शहरातील अनेक विकास कामांवर झाला आहे. श्रेयवाद्यांच्या या लढाईत आतापर्यत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तापासून तर नगरविकास मंत्र्यांपर्यत झाल्या आहेत. त्यातून अनेक कामांची चौकशी सुरू आहे. विद्यमान नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचे जवळपास साडेचार वर्ष तक्रारी करण्यात गेले. त्यांचा परिणाम शहरातील कामांवर दिसून आला. कचरासमस्या पासून फोडलेले रस्तयापर्यत अनेक अडचणी होत्या. असे असतानाही श्रेयवाद तसेच आरोप-प्रत्यारोपातच विद्यमान पालिका सभासदांचा कार्यकाळ संपला.

नगरसेवक पाच वर्षांपासून रस्ते, नालीच्या कामाबाबत ओरडत होते. त्यांच्या ओरडण्याला कार्यकाळ संपण्याच्या काही दिवसांपूर्वी न्याय मिळाला आहे. यवतमाळ पालिका क्षेत्रात जवळपास अकरा कोटींची रस्त्यांची कामे होणार आहे. स्थानिक आमदार, खासदार निधीतून पालिका क्षेत्रात ७४ कामे होणार आहे. यावर साडेतीन कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय, नगरोत्थान, दलित्तेत्तर, दलित वस्ती या तिन योजनेतून जवळपास ६० कामे होणार आहे. दलित वस्ती योजनेच्या कामावर पाच कोटी तर नगरोत्थान, दलित्तेतर कामासाठी अडीच कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या निधीतील कामांना मंजुरी मिळाली आहे. कामे ‘टेंडर’ला लागली आहे. अनेक कामांना सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षापासून रस्त्यासाठी सुरु असलेला नगरसेवकांचा संघर्ष निवडणुका येताच थांबला आहे.