Nagpur Vidhanbhavan
Nagpur Vidhanbhavan Tendernama
विदर्भ

हिवाळी अधिवेशनातून विदर्भाला काय मिळाले हा प्रश्नच पण रस्त्यांची..

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : दोन आठवडे चाललेल्या हिवाळी अधिवेशनातून (Winter Session) विदर्भाला काय मिळाले, याबाबत अनेक तर्क लावले जात असताना दुसरीकडे अधिवेशन संपल्यावरही रस्त्यांच्या डागजुडीसह इतरही कामे  सुरूच आहेत. त्यामुळे विदर्भाच्या जनतेला काही मिळो न मिळो, मात्र चालण्यासाठी रस्ते दुरुस्त होत आहे हे काही कमी नाही.

हिवाळी अधिवेशनाचे कामकाज ३० डिसेंबरला संपले. अधिवेशनासाठी बांधकाम विभागाने ९५ कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार केला होता. कंत्राटदारांनी कामे कमी दराने घेतल्याने यावर ६५ कोटींच्या घरात खर्च झाल्याचे सांगण्यात येते. अधिवेशन काळात बांधकाम विभागाच्या कामावर आमदारांनी नाराजी व्यक्त केली. आमदार, नागरिकांना जेवणासाठी देण्यात येणारे ताट, कप-बशा शौचालयातील नळाच्या पाण्याने धुण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. येथील रस्त्यांवरील डांबरही लवकर निघाल्याचे दिसत होते. रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी करायची होती.

डिव्हिजन एकअंतर्गत ही कामे अद्याप सुरूच असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व कामे दहा लाखांच्या आतील आहेत. सोसायटी व बेरोजगार अभियंत्यांच्या माध्यमातून ही कामे होत असल्याचे सांगण्यात येते. मर्जीतील लोकांना कामे देण्यात आली असून, जुन्या तारखेत ती दाखविण्यात येणार असल्याची चर्चा बांधकाम विभागात आहे. संबंधित उपअभियंते वादग्रस्त असून, एका ठिकाणची जागा मिळण्यासाठी मोठा आटापिटा केला होता; परंतु दुसऱ्या एका अधिकाऱ्याने त्यांचा बेत हाणून पाडला होता. आता अधिवेशन आटोपले. त्यामुळे काम बंद केले जातील असे वाटत होते. मात्र ती सुरूच असल्याने अर्धवट कामे टाकून दिली जाणार नाही असे सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.