Birsi Airport
Birsi Airport Tendernama
विदर्भ

Gondia : बिरसी विमानतळ परिसरातील रस्ते वळविण्यासाठी 103 कोटी निधी द्या; परिणय फुकेंची मागणी

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : तालुक्यातील बिरसी विमानतळाच्या धावपट्टीतून जाणारा खातिया बिरसी कामठा राज्य महामार्ग आणि कामठा परसवाडा मुख्य जिल्हा मार्ग वळविण्यासाठी आवश्यक क्षेत्र संपादन व रस्ता बांधकामासाठी 103 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी पालकमंत्री परिणय फुके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी गोंदियाद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यासाठी अपर मुख्य सचिव आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विमान कंपनी, मर्यादित मुंबई यांना प्रस्तुत केला आहे. मात्र, या प्रस्तावाला राज्य शासनाकडून प्रशासकीय व आर्थिक मान्यता न मिळाल्याने काम रखडले आहे. याप्रकरणी माजी पालकमंत्री तथा माजी वन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोंदियाच्या बिरसी विमानतळाच्या धावपट्टीवरून जाणारे दोन मार्ग वळविण्याबाबत सविस्तर चर्चा केली. रस्ते बांधकाम व शासकीय वनजमीन, विनामोबदला हस्तांतरित करण्याची व शासनस्तरावर तातडीने निधीची तरतूद करण्याची मागणी सी करण्यात आली आहे. फुके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रातून दोन्ही रस्त्यांच्या बांधकामाचा सविस्तर प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिव, विमान वाहतूक मंत्रालय, मुंबई यांच्याकडे प्रशासकीय व आर्थिक मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.

प्रस्तावात नेमके काय :

प्रस्तावांतर्गत, 15.53.94 हे. आर. चौरस मीटर खाजगी जमिनीच्या संपादनासाठी 19 कोटी 18 लाख 55 हजार 768 रु., कामठा बिरसी कामठा राज्य महामार्ग या दोन रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी 79 कोटी 96 लाख रुपये, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, मुंबईच्या आस्थापना खर्चातून 3 कोटी 96 लाख 58 हजार 231 रुपये, खातिया बिरसी- कामठा राज्य महामार्गावर येणाऱ्या कामठा गावाची 0.93 हेक्टर. आर. वनजमीन क्षेत्रातील निर्वाणीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता आणि बिरसी गावात 3.71 हेक्टर. आर. व खातिया येथे 1.2031 हेक्टर आर. आणि कामठा 0.56 हेक्टर आर असे एकूण क्षेत्र 5,4731 हेक्टर आर. चौरस मीटर शासकीय जमीन विना मोबदला हस्तांतरित करून एकूण 103 कोटी 11 लाख 13 हजार 999 रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून देण्याची मागणी केली. यावर ना. फडणवीस यांनी सकारात्मक मार्ग काढून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.