MIDC
MIDC Tendernama
विदर्भ

नागपूर जिल्ह्यात तब्बल एक हजार हेक्टर जागेत आणखी एक एमआयडीसी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : बुटीबोरी (Butibori) आणि हिंगणा (Hingana) येथे एमआयडीसी असताना कुही तालुक्यात ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट ॲंड मॅन्युफॅक्चरिंग झोन (निम्झ) प्रकल्पाच्या ठिकाणी दिल्ली-नागपूर इंडस्टिअल कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. सोबतच नवीन एमआयडीसी झोनही तयार करण्याचे प्रस्तावित आहे. एक हजार हेक्टर जागेत ही एमआयडीसी असणार असून, त्यासाठी जागेचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

कुही तालुक्यात निम्झ प्रकल्प उभारण्यात येणार होता. उमरेड तालुक्यातील काही गावांमधील जमीन सुद्धा संपादित करण्यात येणार होती. यासाठी जवळपास २ ते ३ हजार हेक्टर जागेची आवश्यकता होती. त्यावेळी या प्रकल्पाला काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता.  नंतर हा प्रकल्प इतरत्र हलविण्यात आला. आता याच ठिकाणी दिल्ली- नागपूर इंडस्टिअल कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. उमरडे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्याठिकाणी निम्झ प्रकल्प होणार होता. त्याच ठिकाणी हा दिल्ली- नागपूर इंटस्टिअल कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार कुही तालुक्यात एक नवीन एमआयडीसी तयार करण्यात येणार आहे. ही एमआयडीसी या कॉरिडोर प्रकल्पाला लागूनच असणार आहे. एक हजार हेक्टरमध्ये ही एमआयडीसी असणार आहे. कुही तालुक्यातील जवळपास ११ तर उमरेड तालुक्यातील एक गावामधील जागा यासाठी अधिग्रहित करण्याचे प्रस्तावित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जागेचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ही संपादित केल्यास किती खर्च येईल, शेतकऱ्यांना कोणत्या भावाने व किती मोबदला द्यावा लागेल याचा अहवाल तयार शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.