Nagpur ZP
Nagpur ZP Tendernama
विदर्भ

Nagpur : जिल्हा परिषदेच्या 11 कोटींच्या कामांना 'ग्रीन सिग्नल'

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP) 15व्या वित्त आयोगाच्या आराखड्यास मंजुरीसाठी झालेल्या विशेष सभेत तब्बल 11 कोटी रुपयांच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या आराखड्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

काही वर्षांनंतर प्रथमच सर्व सदस्यांना 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत समान निधी दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताच काही वेळातच सभा आटोपती घेण्यात येईल, असे चित्र स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे प्रकाश खापरे यांनी कामांच्या स्थगितीचा विषय काढताच खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असलेल्या सभेचे वातावरण गंभीर झाले. यास प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते उमरे यांनी कुठल्या कामांवर स्थगिती होती, असा प्रतिप्रश्न केल्याने वादाला तोंड फुटले.

शेवटी विरोधी पक्षनेते आतिष उमरे यांनी 'आराखड्यात अनेक सदस्यांची कामे सुटली आहेत. त्यांचाही विचार करण्यात यावा' अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यावर प्रकाश खापरे यांनी  'अध्यक्षांना दुरुस्तीचे अधिकार द्यावेत व आराखडा एकमताने मंजूर करावा', असा ठराव मांडल्यानंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून त्याचे समर्थन केले.

यंदा 11 कोटी 14 लाख 87 हजार निधी प्राप्त झाला असून, गतवर्षीच्या कामासाठींचा निधी वगळून सुमारे 7 कोटी शिल्लक राहतील. त्यानुसार सर्व सदस्यांना प्रत्येकी 12 लाख रुपयांच्या निधीचे वाटप केले जाणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील (PHC) रुग्ण, तसेच तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात RO मशिन लावले जाणार आहे. हे RO मशीन प्रत्येक पीएचसीच्या बाहेर लावले जाईल. तसेच हागणदारीमुक्त अभियानांतर्गत पीएचसींमध्ये सामुदायिक शौचालयांची कामे केली जातील. याखेरीज जल पुनर्भरण अंतर्गत प्रत्येक पीएचसीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे केली जातील, अशी माहिती उपाध्यक्ष व आरोग्य समितीच्या सभापती कुंदा राऊत यांनी दिली.

सदस्यांत जुगलबंदी

जिल्हा परिषदेत गेल्या काही बैठकांमध्ये काँग्रेस बंडखोर विरोधक विरुद्ध सत्ताधारी सामना रंगतो. अजेंड्यावरील विषय बाजूला राहून एकमेकांचे उणेदुणे काढण्यावरच भर असतो. परंतु, झालेल्या विशेष सभेत 11 कोटी 14 लाख 87 हजार निधीच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.