School Students
School Students Tendernama
विदर्भ

Nagpur: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर साडेचार कोटींचा भार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासकीय शाळांमधील ओबीसी (OBC) व खुल्या प्रवर्गातील (Open) विद्यार्थी (Students) वगळता उर्वरित सर्व प्रवर्गातील मुला-मुलींना मोफत गणवेश (School Uniforms) देण्यात येतो. जिल्ह्यातील 73 हजार 308 विद्यार्थ्यांकरिता प्रती विद्यार्थी 600 रुपये गणवेश याप्रमाणे सुमारे 4.40कोटींचा निधी अपेक्षित आहे.

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि. प. शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि बीपीएल संवर्गातील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेकडे पुढील वर्षी या योजने अंतर्गत गणवेशाचा लाभ देण्यासाठी नोंदणी पूर्ण केली आहे. गतवर्षी सदर योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात आले होते.

2021-22 च्या यूडायएसनुसार जि.प.च्या अखत्यारितील सर्व 1 हजार 515 त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व शाळांतील गणवेशास पात्र 73 हजार 308 विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी परिषदेकडे केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रती दोन गणवेशासाठी सहाशे रुपये याप्रमाणे एकूण 4 कोटी 39 लक्ष 84 हजार 800 रुपये एवढा निधी शिक्षण विभागाला लागणार आहे.

ओबीसी व खुल्या प्रवर्गातील 23 हजार 109 विद्यार्थ्यांपैकी जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांना सेस फंडातून गणवेशासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवर्गनिहाय विद्यार्थी संख्या

अनुसूचित जाती मुले - 6,802

अनुसूचित जमाती मुले - 7,774

बीपीएल प्रवर्गातील मुले -11,240

सर्व मुली - 47,492