Nagpur ZP Tendernama
विदर्भ

दलित वस्ती निधीतून ग्रीन जीम कोणासाठी?प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : दलित वस्ती विकास निधी कशासाठी दिला जातो याचाही विसर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना पडला आहे. या निधीतून चक्क ग्रीन जीमसाठी प्रस्ताव एका सदस्याने दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे सदस्यांचा आग्रह कशासाठी याची खमंग चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाला दलित वस्ती विकास लेखाशीर्ष अंतर्गत ५ कोटींच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा निधी दलित वस्तीच्या विकासाशिवाय इतरत्र खर्च करता येत नाही. असे असतानाही समाज कल्याण समितीमधील अनेक सदस्यांनी ग्रीन जीम साठी निधी देण्याचा आग्रह धरला आहे. काही कंत्राटदारांनाची तसा प्रस्ताव सदस्यांना दिल्याचे समजते. समाज कल्याण समितीच्या सभापती नेमावली माटे यांनी पाच कोटींपैकी अडीच कोटींचा निधी विविध विकास कामे तर अडीच कोटींचा निधी वैयक्तिक लाभाच्या योजनेवर खर्च करण्यात येणार आहे. त्यावर समाज कल्याण समितीच्या बैठकीत चर्चासुद्धा झाली.

ग्रीन जीमला निधी द्यावा याकरिता सदस्यांकडून प्रस्ताव आल्याचे सभापती माटे यांनी सांगितले. शासनाच्या निकषानुसार अनुसूचित जातीचे लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात या लेखाशीर्ष अंतर्गत विकास कामे करता येते. बांधकामे किंवा रस्त्याशी संबंधित कामे हाती घेता येते. ग्रीन जीमचे साहित्य वाटप यासारखे कामे करता येत नाही. परंतु त्यानंतरही सदस्यांकडून ग्रीन जीमचे प्रस्ताव देण्यात आले. विभागाकडून संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी समितीसमोर ठेवण्यात आले. काही सदस्य यासाठी आग्रही असून त्यांच्यामुळे संबंधित प्रस्ताव तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.