RTMNU Nagpur
RTMNU Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : राज्यपालांनी नागपुरात का घेतला कुलगुरूंचा ‘क्लास’? काय आहे प्रकरण?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या समस्या सुटत नसल्याने ते तक्रार घेऊन राज्यपालांकडे येतात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आणि चिंतेची विनम्रपणे आणि निकडीच्या भावनेने उत्तरे देण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठाची आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी विद्यापीठांनी त्यांच्या कारभारात सुधारणा कराव्यात, अशा स्पष्ट सूचना देत राज्यपाल रमेश बैस यांनी कुलगुरूंना कानपिचक्या दिल्या.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित शताब्दी वर्षानिमित्त सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर उपस्थित होते. याशिवाय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. 

राज्यपाल बैस म्हणाले, विद्यापीठांमध्ये निकाल उशिरा येणे, परीक्षेबाबतच्या समस्या आणि इतर कारणांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांच्या भरतीकडे विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी तातडीने लक्ष दिले पाहिजे. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये 30 ते 40 टक्के शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे ते म्हणाले. 

जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये, शिक्षकांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून केले जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षक मूल्यमापन आमच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये देखील सुरू केले पाहिजे. विद्यापीठांच्या मानांकना इतकेच शिक्षकांचे मानांकन महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालये आणि विद्यापीठांची चांगली निवड करण्यास मदत होईल, असेही राज्यपाल बैस यांनी सांगितले. 

न्यायमूर्ती सिरपूरकर यांनी कोणताही पुरस्कार हा त्या व्यक्तीच्या कामाला न्याय देणारा असतो. विद्यापीठाने असे हिरे शोधून काढले आणि त्यांना सन्मानित केले. याबाबत विद्यापीठाचे कौतुक केले. कार्यक्रमात जीवन साधना पुरस्कार, आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक, प्राचार्य बलराज अहेर स्मृती सुवर्णपदक, शताब्दी महोत्सव सुवर्णपदक, आदर्श अधिकारी पुरस्कार (वर्ग 1), आदर्श अधिकारी पुरस्कार (वर्ग 2), आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ वर्ग 3), आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ वर्ग 4), उत्कृष्ट राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार, उत्कृष्ट लेखक या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.