electricity poll
electricity poll Tendernama
विदर्भ

Nagpur शहरातील 19 रस्ते का बनले धोकादायक? जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : रस्ता रुंदीकरणानंतर अनेक भागातील विद्युत खांब रस्त्याच्या मध्यभागी अडथळा म्हणून उभे आहेत. त्यामुळे रस्त्यातून जाणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

हे खांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. शहरातील सुमारे 19 रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे 1258 विद्युत खांब हटविण्यासाठी 146 कोटींची तरतूद करण्यात आली होती. रस्त्यावरील खांब हटविण्यासाठी महावितरणला 50 टक्के रक्कम द्यायची होती. उर्वरित 50 टक्के रक्कम महापालिकेला द्यायची होती. 1258 विद्युत खांब हटविण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली, मात्र अजून पर्यंत हे खांब हटवता आले नाहीत.

खांब स्थलांतरित करण्यासाठी महावितरणकडून आतापर्यंत सुमारे 68 कोटी रुपये महापालिकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. असे असूनही समस्या जैसे थेच आहे. महापालिकेच्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विजेचे खांब अपघाताचे कारण बनले आहेत.

ग्राहकांच्या बिलात वाढ करून जमा केले 45 कोटी

2010 मध्ये महापालिका आणि महावितरण यांच्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 50 टक्के रक्कम महापालिका आणि 50 टक्के रक्कम महावितरण देणार असल्याचा निर्णय झाला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महावितरणने ग्राहकांच्या बिलात 6 पैशांनी वाढ करून 45 कोटी रुपये जमा केले. महावितरणने ही रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा केली. उर्वरित रक्कम महापालिकेला द्यायची होती, मात्र निधी उपलब्ध न झाल्याने महापालिका आपला हिस्सा देऊ शकली नाही.

सुरवातीला या प्रकल्पासाठी 96 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. काळाच्या ओघात खर्च वाढला आणि प्रकल्प 146 कोटींवर पोहोचला. खर्च वाढल्याचे कारण देत महापालिकेने महावितरणकडे अतिरिक्त 23 कोटी रुपयांची मागणी केली. महावितरणने पुन्हा ग्राहकांच्या बिलात काही पैशांनी वाढ करून रक्कम वाढवली. अशाप्रकारे निधी उपलब्ध होऊनही शहरातील रस्त्यांच्या मधोमध विद्युत खांब काढण्यात आलेले नाहीत.

वीज योजनेवर 223 कोटी रुपये खर्च झाले

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेवर आतापर्यंत 223 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रकमेतून अनेक भागात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. तर शहरातील त्या 19 रस्त्यांची अवस्था अजूनही जैसे थे आहे. या रस्त्यांच्या मधोमध उभे असलेल्या विद्युत खांबामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.