नागपूर (Nagpur) : पुढील वर्षात नागपूर सुधार प्रन्यास (NIT) 572 आणि 1900 नवीन लेआऊटमध्ये सुविधा पुरविण्यासाठी 355 कोटी रुपये खर्च करणार आहे. याशिवाय रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंट रस्त्यांसाठी 275 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षात एनआयटीची विभागीय कार्यालयेही चकाचक होणार असून, त्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (NIT Budget)
मंगळवारी अर्थसंकल्पीय बैठक पार पडली. यात एनआयटी सभापती व एनएमआरडीचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नासुप्र विश्वस्त आमदार मोहन मते, संदीप इटकेलवार, नगररचना विभागाच्या सहायक संचालक व विश्वस्त सुप्रिया थूल उपस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
या बैठकीत विश्वस्त मंडळाने एनआयटीच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 213 कोटी 96 लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. एनआयटीला पुढील वर्षात भूखंड व दुकानांच्या भाडेपट्ट्यातून 290 कोटी रुपये प्राप्त होणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय विकास निधीतून 60 कोटी रुपये मिळतील. पुढील वर्षात नव्या लेआऊटसह 572 व 1900 ले-आऊटमध्ये पायाभूत सुविधांसाठी 355 कोटी तर सिमेंट रस्त्यांसाठी 275 कोटी खर्च करण्यात येणार आहे.
दलित वस्ती सुधार योजना, दलितेतर वस्ती सुधार योजना, आमदार निधी, खासदार निधी, मानेवाड्यातील ई-लायब्ररी, अपंग व्यक्तींच्या योजनांसाठी 201कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आशिर्वादनगर व कळमना येथे बाजाराच्या विकासासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
गोकुळपेठ मार्केटचा करणार विकास
गोकुळपेठ येथे मार्केट तयार करण्यात येणार आहे. महापालिका व एनआयटी या प्रकल्पातील नफा 50-50 टक्के वाटून घेणार आहेत. विश्वस्त मंडळाने शिक्कामोर्तब केले. येथे मल्टिलेव्हल पार्किंगचे काम सुरू आहे.
खेळाच्या मैदानासाठी 100 कोटींचा विकास आराखडा, शहरातील विविध खेळांच्या मैदानाच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या विकासाचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यात स्पोर्ट पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी तूर्तास 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.