Mayo Hospital
Mayo Hospital Tendernama
विदर्भ

Nagpur : मेयोसाठी नव्याने 144 कोटींचा निधी मंजूर; मेडिसिन कॉम्प्लेक्सचा खर्च पुन्हा वाढला

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मेयो रुग्णालयात मेडिसिन कॉम्प्लेक्सचे (विंग) बांधकाम पाच वर्षे रखडल्याने 77 कोटींची ही इमारत आता 144 कोटींवर गेली. याबाबत उच्चाधिकार समितीने मंजुरी दिल्यानंतर टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. दरम्यान हा वाढता खर्च जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याची चर्चा मेयो वर्तुळात रंगली आहे.

सव्वाशे वर्षे जुन्या मेयोत एकूण 44 वॉर्ड आहेत. जुने वॉर्ड जीर्ण झाले आहेत. व्हीएनआयटीने स्ट्रक्चरल ऑडिटनंतर अहवाल दिला होता. नुकतेच केवळ 594 मंजूर खाटांच्या मेयोत मेडिसीन कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर एकूण खाटांची क्षमता 883 होईल.

मेयोत साडेतीन लाख स्केअर फुटाच्या बांधकामासाठी पाच वर्षांपूर्वी 77 कोटींचा निधी प्रस्तावित होता. यानंतर 2022 मध्ये दुसरा प्रस्ताव सादर करून 119 कोटीत हे बांधकाम होणार होते. मात्र अलीकडे नव्याने तयार झालेल्या प्रस्तावात हा प्रकल्प 144 कोटींवर पोहोचला. मेडिसिन कॉम्प्लेक्सची सुमारे दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार, हे मात्र निश्चित आहे.

मेयो रुग्णालयात प्रशासकीय इमारत तयार झाली. मार्चपर्यंत हस्तांतरण होईल असा अंदाज आहे. मेडिसिन कॉम्प्लेक्सच्या (विंग) 144 कोटीच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सात माळ्यांचे हे कॉम्प्लेक्स असेल. पुढे 11 माळ्यांपर्यंत बांधकाम करता येईल, असे फाउंडेशन तयार केले जाईल, अशी माहिती मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांनी दिली.

बांधकाम रखडले की खर्च वाढतो

मेयो, मेडिकल, शासकीय दंत महाविद्यालयातील बांधकामांचे प्रस्ताव वर्षांनुवर्षे रखडतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग नवीन प्रस्ताव सादर करतो. बांधकामाचा खर्च वाढतो. हे मुद्दाम केले जाते का, असा सवाल मेयो मेडिकल वर्तुळात विचारला जात आहे.