Potholes
Potholes Tendernama
विदर्भ

Nagpur : लवकरच रस्ते होणार खड्डेमुक्त; झोननिहाय खड्डयांची तपासणी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दरवर्षी दिसून येते. महापालिकेने शहरातील खड्डे बुजविण्यासाठी कंबर कसली असून झोननिहाय खड्डयांची तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील 3 हजार 549 किमी रस्त्यांवरील खड्डयांची पाहणी करण्यात येणार आहे.

डांबरी रस्ते आणि पावसाळ्यात त्यांची चाळणी होणे हे समीकरण ठरले आहे. आता डांबरी रस्ते फारसे नसले तरी यंदा पावसाळ्यात नागरिकांना खड्डे मुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी हॉटमिक्स विभाग कामाला लागला आहे. हॉटमिक्स विभागाने दहाही झोनच्या कार्यकारी अभियंत्यांना रस्त्यांची स्थिती पाहण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. मागील वर्षी महापालिकेने 6 हजार 44 खड्डे बुजविले होते. यावेळी महापालिका रस्ते दुरुस्तीच प्रा नव्हे तर रस्त्याच्या मालकीचे एजन्सीचे नावही अहवालात नमूद करणार आहे. त्यामुळे केवळ महापालिकेचे रस्ते आणि त्यावरील खड्डे यावरच लक्ष केंद्रित असणार आहे.

शहरात एकूण 3 हजार 549 किमीचे रस्ते आहेत. यात महापालिकेचे दोन हजार 406 किमीचे रस्ते आहेत. इतर रस्ते नासुप्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे आहेत. परंतु नागरिक महापालिकेलाच दोष देत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मागील वर्षी महापालिकेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावे लागले होते. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेलाच खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला होता, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले. हिंगणा रस्ता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले.

नासुप्र व इतर संस्थांनी त्यांचे रस्ते करावे

महापालिका शहरातील सर्वच 3 हजार 549 किमी रस्त्यांची पाहणी करणार आहे. परंतु महापालिका प्रशासन त्यांच्याच अडीच हजार रस्त्यांवरील खड्डे बुजविणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग नासुप्रला त्यांच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. याबाबत महापालिका या संस्थांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याचे सूत्राने नमूद केले.

कमी रुंद रस्त्यांची दुरुस्ती झोन स्तरावर

महापालिकेचा हॉटमिक्स विभाग 12 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहे. 12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची दुरुस्ती झोनस्तरावर केली जाणार असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. मागील वर्षी सर्वाधिक 1 हजार 357 खड्डे मंगळवारी झोनमधील बुजविण्यात आले होते. लकडगंजमधील 986 खड्डे बुजविण्यात आले.