Ambazari Park
Ambazari Park Tendernama
विदर्भ

Nagpur: विरोध डावलून अंबाझरी पार्कातील 'या' प्रकल्पाचे भूमीपूजन

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : ऑरेंज सिटी आणि अंबाझरी पार्कला नवसंजीवनी देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवनाच्या बांधकामाला भूमीपूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी आंबेडकर समाज भवनाच्या प्रतिकृतीचे अनावरणही करण्यात आले.

42.5 एकरच्या प्रशस्त परिसरात साकार होणारा हा जागतिक दर्जाचा हा थीम पार्क राहणार आहे. या अंतर्गत विविध छोटे-मोठे प्रकल्प साकारले जाणार आहेत. आद्य क्रांतिवीर लहूजी साळवे उद्यान (अंबाझरी उद्यान) विकास प्रकल्पांतर्गत उच्च व्यावसायिक तज्ज्ञांनी डिझाईन केलेला व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा 42.5 एकरच्या प्रशस्त परिसरात साकार होणारा जागतिक दर्जाचा थिम पार्क आहे. 20 हजार चौरस फुटांच्या प्रशस्त परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क साकारले जाणार आहेत.

90 कोटींचे टेंडर

महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे गरुडा अम्युझमेंट पार्क प्रा. लि. या कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. हे टेंडर अंदाजे 80-90 कोटींचे आहे. 14 एप्रिल 2024 पर्यंत म्हणजेच एका वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती गरुडा अम्यूझमेंट पार्क प्रा. ली. कंपनीचे संचालक नरेंद्र जिचकार यांनी दिली.

प्रकल्पाला स्थानीय नेत्यांचा विरोध

या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन होते. ते पाडण्यात आले. त्यास पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे आणि अंबाझरी बचाव कृती समितीचे अधिकारी किशोर गजभिये यांचा विरोध आहे. यासाठी अनेकदा आंदोलने सुद्धा झाली. महामंडळाने कुणाचे हित साधण्यासाठी गरुडा अम्युझमेंट पार्क कंपनीला ३० वर्षांसाठी लीजवर जागा दिली, असे सवाल करून विकास ठाकरे यांनी करारानुसार अपेक्षित महसूल लक्षात घेता कंपनीच्या फायद्यासाठी व्यवहार झाल्याची शंका उपस्थित केली होती. हा विरोध डावलून या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली आहे.