Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : 1165 कोटी मंजूर पण एक पैसाही नाही मिळाला

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात येत आहेत. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे, मात्र शासकीय आरोग्य केंद्रे, रुग्णालये याकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे.

सरकारच्या धोरणे व नियमांमुळे मेडिकल, मेयो, सुपर स्पेशालिटीमधील प्रस्तावित योजनांसह बांधकामाधीन जिल्हा रुग्णालये पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 8 वर्षांपासून डॉ. आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र प्रत्यक्षात येण्याच्या प्रतीक्षेत आहे, मात्र ही योजना केवळ कागदापूर्तिच राहिली आहे. गेल्या वेळी ऑक्टोबर 2021 मध्ये 1165 कोटी रुपये मंजूर झाले होते. 15 महिने उलटले, मात्र या योजनेसाठी सरकार 15 रुपयेही देऊ शकले नाही. आता हे पूर्ण होऊ शकेल की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

निधी उपलब्ध झाल्यास सुरू होईल प्रक्रिया

आरोग्य क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहरात महत्त्वाकांक्षी योजना साकारण्याची योजना आखली. राज्यात सत्तांतरमुळे योजना प्रत्यक्ष सुरु होण्यास अडचण निर्माण होत आहे. उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हेल्थ एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 2021 मध्ये अंतिम मंजुरी दिली होती आणि त्यासाठी 1165 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र 15 महिने उलटून गेले तरी शासनाने या योजनेसाठी एक पैसाही दिला नाही. त्यामुळे संस्थेच्या बांधकामाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. वर्ष 2022 मध्ये अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली नाही. यावेळी तरतूद झाली तरच पुढचा मार्ग मोकळा होईल, अन्यथा ही योजना शिल्लक राहील. 8 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला, तेव्हापासून ही योजना केवळ कागदावरच आहे.

पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांना मान्यता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची श्रेणी वाढवण्यात येणार आहे. येथे 615 बेड चे रुग्णालय सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच नवीन पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. सध्या नवीन पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांसाठी शहरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. डीएम न्यूरोलॉजी, एम सी एच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, एम सी एच बालरोग शस्त्रक्रिया, डीएम इमर्जन्सी मेडिसिन, डीएम गॅस्ट्रोलॉजी, एम सी एच प्लास्टिक सर्जरी,  एम सी एच रेस्पिरेटरी मेडिसिन, इत्यादी पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांना श्रेणी विस्तारासाठी मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय दंतरोग, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि रक्तासंबंधीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भविष्यात येथे नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेज सुरू करण्याची योजना आहे.  या रुग्णालयात 2005 पासून ओपीडी सुरू आहे. येथे दररोज 400 ते 500 रुग्णांवर उपचार केले जातात. नवीन प्रस्तावानुसार येथील 7.56 एकर जागेवर नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्यात येणार आहे, तर 8.50 एकर जागेवर कर्मचाऱ्यांसाठी संकुल बांधण्यात येणार आहे. कोट्यावधीची एवढी मोठी योजना असून निधि अभावी डॉ आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र अजूनही कागदोपत्री मर्यादित  आहे.