Gosikhurd Tendernama
विदर्भ

Nagpur : Good News! गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पासाठी 101 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्धतेसाठी व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने 101 कोटी 55 लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे स्थानिक युवकांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील धरणक्षेत्र तसेच जलाशयामध्ये जल पर्यटन विकसीत करून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धींगत करणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरातही जागतिक दर्जाचे जलपर्यटन निर्माण करण्यात येणार आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावासंदर्भात शिफारस करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या बैठकीत गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी  101 कोटी 55 लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. नुकताच यासंदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामध्ये झालेल्या सामंजस्य करारानूसार गोसीखुर्द जलाशय परिसरात सदर प्रकल्प सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून (पीपीपी)  होणार आहे.