Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur होऊ दे खर्च; सरकार आहे घरचं! नुतनीकरणावर 11 कोटींचा चुराडा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : अधिकाऱ्यांची इच्छा असली तर सरकारी (Govt.) कामेही भव्यदिव्य होऊ शकतात. त्यानंतर पैशाचा तुटवडा, बचत, अर्थसंकल्पीय तरतूद, तसेच आर्थिक मंदी यापैकी कुठलेच नियम आणि बहाणे लागू होत नाही. नागपूरच्या विभागीय कार्यालयाच्या (Nagpur Div. Office) इमारतीच्या बाबतही हेच दिसून येते. या इमारतीचे नुतनीकरणासाठी तब्बल ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

नागपूरच्या विभागीय कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन आहे. लाल दगडाने बांधलेही ही इमारत आजही मजबूतपणे उभी आहे. इमारतीच्या मधोमध मोकळ जागा, प्रशस्त कक्ष, दोन हत्तीच्या उंचीचे दरवाजे, चारही बाजूने वारा येथील अशी व्यवस्था, भर उन्हाळ्यातही थंडावा जाणावेल अशा पद्धतीने केलेली रचना असा सर्व वास्तुशास्त्राचा विचार इमारत बांधताना केला आहे. मात्र या जुन्या इमारतीत बसण्याचा अधिकाऱ्यांना कंटाळा आहे. त्यांना कर्पोरेट आधुनिक पद्धतीचे कार्यालय हवे आहे.

ही वास्तुचा हेरिटेजमध्ये समावेश असल्याने ती पाडता येत नाही. फक्त आतून डागडुजी करता येते. त्यामुळे वास्तुची बाह्य रचना तशीच ठेवून आतून या इमारतीला कार्पोरेट लुक देण्याचे ठरवण्यात आले आहे.

याकरिता महाविकास आघाडीच्याच कार्यकाळात ११ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या कामाचे टेंडर निघणार होते. मात्र शिक्षक आमदार निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने आणखी पंधरा दिवस थांबावले लागणार आहे. टेंडरची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहिता संपताच टेंडर काढण्यात येणार आहे. अधिकऱ्यांच्या लेखी ११ कोटींचा खर्च क्षुल्लक आहे. या खर्चातून निम्मा खर्च फर्निचरवर केला जाणार आहे. थोडीफार डागडुजी आणि रंगरंगटीही केली जाणार आहे.

येथील एका अधिकाऱ्याने आपला कक्ष यापूर्वीच अद्यावत करून घेतला आहे. कंत्राटदाराने प्रायोगिक तत्त्वावर तो करून दिला आहे. त्या कक्षाच्या प्रेमात इतरही अधिकारी पडले आहे. त्यामुळे आता ११ कोटींचा खर्च काढून संपूर्ण कार्यालयाचे नुतनीकरण केले जात असल्याचे समजते.