Butibori Bus Stand
Butibori Bus Stand Tendernama
विदर्भ

Nagpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होऊनही 'या' बस स्थानकात का थांबेना बस?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते बुटीबोरी येथे नव्याने बांधलेल्या बसस्थानकाचे (Bus Stand) 14 जून 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले होते. दुर्दैव म्हणजे, अडीच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या बसस्थानकात एकदाही बस आली नाही. त्यामुळे करदात्यांच्या पैशाचा चुराडा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागपूर - वर्धा मार्गावरील बुटीबोरी हे महत्त्वाचे शहर आहे. सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांत येथे अनेक सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत. बुटीबोरीला अनेक वर्षांपासून एका चांगल्या बसस्थानकाची प्रतिक्षा होती. अखेर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बसस्थानकाचे उद्घाटन केले होते. आज दोन महिने झाले तरी बसस्थानकात एकदाही बस आली नाही. त्यामुळे हे बसस्थानक बांधलेच कशासाठी, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. ही वास्तू पांढरी हत्ती ठरली आहे. 

येथे दररोज 314 बसफेऱ्या होतील, असे लोकार्पणाच्यावेळी घोषित करण्यात आले होते. पण, ही घोषणा फोल ठरली. आता बसस्थानकात गुन्हेगारी तत्त्वांचा वावर वाढला आहे.

सहा वर्षांनी लोकार्पण

नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत स्थानिक लोकप्रतिनिधींचा सततचा पाठपुरावा आणि आमदार समीर मेघे यांच्या पुढाकारातून बुटीबोरी शहरासाठी सुसज्ज असे बसस्थानक बनविण्यात आले. या बसस्थानकाचे तब्बल सहा वर्षांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण देखील करण्यात आले.

बसस्थानकात गाई बांधू

अडीच कोटी खर्च करूनही बसस्थानक पांढरा हत्ती ठरले आहे. महामंडळाला जर काही तांत्रिक अडचणी होत्या तर त्या आधीच दूर करणे आवश्यक होते. बसस्थानकात बस उभी करण्याबाबत अनेकदा चालक आणि वाहकांना विनंती केली पण काहीच उपयोग झाला नाही. महामंडळाने यावर तोडगा न काढल्यास बसस्थानकात गाई बांधून तेथे गोशाळा तयार करू, असा इशारा बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी दिला आहे.