Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

नागपुरात मेडिकल, मेयोसाठी १६०० कोटी येणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) ः उपराजधानीतील मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेयोचे आगामी काळात श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. मेडिकलच्या श्रेणीवर्धनासाठी सुमारे ११०० कोटी तर मेयोच्या सुमारे ५०० कोटीचे प्रस्ताव येत्या दहा दिवसांमध्ये सादर करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी रविवारी दिली. त्यांनी मेडिकल, मेयो भेट दिली. विशेष असे की, मेडिकलचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.

वर्षानुवर्षे कोट्यावधींच्या योजना राबविण्या संदर्भातील घोषणांचा पाऊस सरकारकडून पाडण्यात येतो. प्रामुख्याने मेडिकलमध्ये तीन वर्षांपूर्वी स्पाईन इंज्युरी सेंटरसह लंग इन्स्टिट्यूट, प्रादेशिक वृद्ध उपचार केंद्र, प्रादेशिक पॅरामेडिकल केंद्र, सिकलसेल इन्स्टिट्यूट तयार करण्यात येतील असे सांगण्यात आले. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १ हजार कोटीपेक्षा जास्त निधीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र या प्रस्तावाचे काय झाले हे अद्याप सांगता येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल, मेयोच्या समस्यांचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील आठवड्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.

यात जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मेडिकल, मेयोच्या समस्या जाणून घेतल्या. तर रविवार १६ ऑक्टोबरला दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना भेटी दिल्या. यात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यासह सर्व विभागप्रमुख तसेच मेयोच्या अधिष्ठाता डॉ. लीला अभिचंदनी यांच्यासह सर्व विभागप्रमुखांकडून त्यांच्या विभागाच्या आधुनिकीकरणासंदर्भात चर्चा केली. मेडिकलमध्ये एमबीबीएसचे केवळ दीडशे विद्यार्थी प्रवेश होत होते. परंतु ही संख्या वाढत गेली. आता मेडिकलमध्ये अडीचशे एमबीबीएसचे प्रवेश होतात. चार वर्षात १ हजार विद्यार्थी एकावेळी असतात. यामुळे त्यांच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या निवासाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. याच राज्य सरकारने मेडिकल आणि मेयो विकासाचा ध्यास घेतला असून लवकरच श्रेणीवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे संकेत मिळाले असल्यानेच तातडीने जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मेयो आणि मेडिकलमध्ये निरीक्षण केले.