Mantralaya
Mantralaya Tendernama
विदर्भ

Nagpur : परीक्षा शुल्काच्या नावाखाली खासगी एजन्सी अन् सरकार खिसे भरतेय का?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : तलाठी भरतीप्रमाणेच (Talathi Bharti) जिल्हा परिषदेच्या (ZP) भरतीसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. तलाठी भरतीसाठी आकारण्यात येणारे शुल्क जास्त असून, गरीब विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याची टीका सरकारवर झाली. परंतु या टीकेला झुगारत सरकारने हा निर्णय कायम ठेवला. जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी एक हजार व नऊशे रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. 

तलाठी भरती प्रक्रियेची परीक्षा खासगी एजन्सीकडून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेची परीक्षाही खासगी एजन्सी मार्फतच घेतली जाणार आहे. तलाठी भरती प्रकियेतून खासगी एजन्सी मालामाल झाल्याचा आरोप करण्यात आला. शेकडो कोटी रुपये परीक्षा शुल्काच्या रुपात एजन्सी व शासनाला मिळाले. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

आता जिल्हा परिषदेच्या जागांसाठी भरती होणार आहे. शनिवारी नागपूर जिल्हा परिषदेच्या 557 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. खुल्या वर्गातील उमेदवारांना 1 हजार तर आरक्षित वर्गातील (ओबीसी, एससी, एसटी) उमेदवारांना 900 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी आकारल्या जाणाऱ्या परीक्षा शुल्काच्या तिप्पट हे शुल्क आहे. मोठ्या प्रमाणात राज्यात बेरोजगारी आहे. लाखो उमेदवार या परीक्षेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातूनही खासगी एजन्सी व शासनाला शेकडो कोटी रुपये प्राप्त होतील.

परीक्षा शुल्क फार जास्त असून, ते सर्सावमान्य, गरीब विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. पैशाअभावी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. एमपीएससीची परीक्षा ऑफलाइन असते. कागद लागतो. तरी त्यासाठी शुल्क 300 ते 350 रुपये असते. ही परीक्षा ऑनलाइन असूनही जास्त शुल्क आकारले जात आहे. एक प्रकारे ही विद्यार्थ्यांची लूट आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

या पदांसाठी होणार भरती

आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक - महिला) 308, औषध उत्पादन अधिकारी 11, कंत्राटी ग्रामसेवक 26, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (बांधकाम/ग्रा.पा.पुरवठा) 27, कनिष्ठ लेखा अधिकारी 2, कनिष्ठ सहाय्यक (कारकून) 10, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 6, मुख्य सेविका (अंगणवाडी पर्यवेक्षक) 5, पशुधन पर्यवेक्षक 3, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2, लघुलेखक (निम्न श्रेणी) 1, वरिष्ठ सहाय्यक (लीपिक वर्गीय) 2, वरिष्ठ सहाय्यक (खाते) 2, विस्तार अधिकारी (कृषी) 4, विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग 3 श्रेणी 2) 9, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे विभाग) 35, आरोग्य पर्यवेक्षक 2, आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्क्यांमधून 20, आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र) यातून 80 अशाप्रकारे पदभरती केली जाणार आहे.