नागपूर (Nagpur) : नागपूर महानगरपालिकेद्वारे 34 नवीन 'स्मार्ट पब्लिक टॉयलेट' निर्माण करण्यात येणार आहेत. यासंदर्भात विभागाद्वारे विस्तृत प्रकल्प अहवाल मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यापुढे सादर करण्यात आला.
वास्तुविशारद सुधाकर किणी यांनी स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे डिझाइन आणि सुविधांबाबत माहिती दिली. नवीन स्मार्ट टॉयलेटसाठी 44 ठिकाणचे सर्वेक्षण करून त्यातून 34 ठिकाणे निश्चित करण्यात आली. 34 ठिकाणांमध्ये मनपाच्या 10 जागा, एनआयटीच्या 2 जागा आणि 22 फुटपाथचा समावेश आहे. स्मार्ट पब्लिक टॉयलेट संदर्भात कंटेम्परी, अल्ट्रा मॉडर्न आणि हेरिटेज असे तीन प्रकारचे डिझाइन यावेळी सादर करण्यात आले. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 16.73 कोटी आहे.
येथे होणार स्मार्ट टॉयलेट :
एम.ए. गर्ल स्कूल जवळ झाशी राणी चौक सीताबर्डी, कॉर्नर अपार्टमेंट जवळ म्हाळगीनगर चौक, राणी दुर्गावती चौक, कळमना आरटीओ शेजारी उड्डाण पुलाजवळ, अमरावती रोड भोले पेट्रोल पंप, गायत्री नगर नासुप्र उद्यान झिगाबाई टाकळी, तुळशी नगर चौक जरीपटका बाजार रोड, गिट्टीखदान चौक काटोल रोड, संजय गांधीनगर उदय नगर चौक,
ऑरेंज सिटी स्ट्रीटजवळ जयताळा बाजार रोड, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट शनी मंदिर रोड सीताबर्डी, उत्तर अंबाझरी रोड माटे चौक, सुपर स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटल तुकडोजी पुतळा, ट्रॉन्स्पोर्टनगर टी पॉइंट भंडारा रोड उड्डाण पूल, अवस्थीनगर चौक, पंचशील चौक, कॅनल रोड, स्मशानभूमी बेसा शहर बसस्थानक मानेवाडा-बेसा रोड, परंपरा लॉन चौक जुना भंडारा रोड.
दिघोरी उड्डाण पुलाखाली दिघोरी चौक, भवानी माता ट्रस्ट हॉस्पिटलसमोर पारडी, सेव्हन स्टार हॉस्पिटलसमोर जगनाडे चौक, मनपा ईएसआर प्रजापती चौक, नागपूर विद्यापीठ कॅम्पस चौक, नाग मंदिर समोर उमरेड रोड,
केअर हॉस्पिटलजवळ हितवाद कार्यालयाच्या बाजूला, भांडेवाडी एसटीपी, कांजी हाऊस चौक, मोरभवन बसस्थानक, ओंकारनगर चौक, ऑटोमोटिव्ह चौक, छत्रपती चौक, लिबर्टी टॉकीज पार्किंग सदर, आय.टी. पार्क रोड व्हीआयपीएल, व्यंकटेशनगर बाजार.
या मिळणार सुविधा...
स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, स्नानगृह आणि स्तनदा मातांसाठी वातानुकूलित हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हिल चेअर, महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच डिस्ट्रॉय मशीन, हँड ड्रायर, सेन्सर प्रणालीयुक्त दरवाजे आदी.