Bio Waste
Bio Waste Tendernama
विदर्भ

Nagpur: रोजच्या 2 हजार किलो जैविक कचऱ्याचे करायचे काय?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील हॉस्पिटल, क्लिनिक, पॅथॉलाजीतून दररोज एकूण दोन हजार किलो जैविक कचरा निघत असून, कोरोना काळाच्या तुलनेत यात घट झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात दररोज तीन टन अर्थात तीन हजार किलोवर जैविक कचरा निघत होता. गेल्या साडेतीन वर्षात चार हजार टन वैद्यकीय कचरा निघाला आहे. या कचऱ्याचे करायचे काय प्रश्न महापालिकेला पडला आहे.

सध्याच्या काळात ई-कचऱ्याप्रमाणेच जैव वैद्यकीय कचरा महत्त्वपूर्ण मानला जातो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकते. या कचऱ्यामध्ये वापरलेली इंजेक्शन्स, मलमपट्टी केलेले कापसाचे बोळे, शस्त्रक्रिया करून काढलेले शरीराचे भाग, बँडेजेस, रक्त, थुंकी, लघवीचे नमुने, औषधे यांचा समावेश होतो. त्यात अनेक प्रकारचे रोगजंतू, विषाणू असतात. त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सुपर हायजेनिक डिस्पोजल प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला दिली आहे. ३० वर्षांच्या कंत्राट पद्धतीवर या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

महानगरपालिकेकडे सध्या ६४६ हॉस्पिटल्स, १०१० क्लिनिक्स, २९४ पॅथॉलाजी लॅब्स असून काही एक्स-रे सेंटर व रक्तपेढ्याही आहेत. यातून दररोज २ हजार १५७ किलो अर्थात दोन टन जैविक कचरा निघत असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीतून पुढे आली.

या रुग्णालयातून निघणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्यासाठी प्रती खाट दरमहा २३८ रुपये शुल्क आकारले जाते. ओडीपीसाठी २९३ रुपये दरमहा शुल्क घेतले जाते. एक्स रे सेंटर, क्लिनिक, पॅथालॉजी, रक्तपेढीसाठी दरमहा ७७२ रुपये शुल्क आकारले जाते. रुग्णालयातून सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीचे कामगार आपल्या वाहनासह जाऊन कचरा संकलन करतात. जैव वैद्यकीय कचरा पिवळ्या (ज्वलनभट्टीत जाणारा कचरा), लाल (थ्रेडिंग, रिसायकलिंग व डंम्पिंगला जाणारा कचरा) व पांढरा (धारदार, काचेचा कचरा) पिशव्यांमध्ये गोळा करण्यात येतो.

हा कचरा संकलित करण्यासाठी जीपीएस यंत्रणायुक्त वाहनांची सोय करण्यात आली आहे. इंसिनरेशन प्रक्रियेमध्ये १८०० डिग्री सेंटीग्रेडला ज्वलनभट्टीमध्ये विषारी जीवाणू व जंतुसंसर्ग नष्ट करण्यासाठी हा कचरा जाळला जातो. भांडेवाडीतील प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत महसूलही गोळा होत आहे.

वर्षनिहाय जैविक कचरा मनपाला मिळालेला महसूल
वर्ष : कचरा (टनात) : महसूल (रुपयांत)
२०१९ : १४१७.५०५ : ३४,४०,६९५
२०२० : १५०९.२६२ : ३७,८४,७६६
२०२१ : १३५०.०३५ : ३७,८४,७६६
२०२२ : ५५५.५१२ : ३७,८४,७६६