Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

हिवाळी अधिवेशनासाठी टेंडरची रक्कम ९५ 'खोके', ठेकेदार एकदम ओक्के!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी ९५ कोटी रुपयांचे टेंडर (Tender) काढण्याचा निर्णय झाला आहे. येत्या आठवड्यात त्याचे कार्यादेशसुद्धा काढण्यात येणार असल्याने ठेकेदार एकदम ओक्के झाले आहेत.

दोन वर्षानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होऊ घातले आहे. त्यामुळे खर्चाचा आकडाही ३५ कोटी रुपयांनी वाढला आहे. दोन वर्षांमध्ये झालेले नुकसान वाढीव कामातून भरून काढण्यात येणार असल्याचे समजते. १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. तशी घोषणाही करण्यात आली आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी सरकाच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन अधिवेशन होऊ शकले नाही. आघाडीच्या दुसऱ्या वर्षांच्या काळात कोरोनो ओसरला होता. तेव्हा अधिवेशन होण्याची शक्यता वर्तविला जात होती. मुंबईतील झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुढील अधिवेशन नागपूरला होईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली होती.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येईल असे जाहीर केले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे विदर्भात मोठी नाराजी व्यक्त होत होती. शिंदेसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच हिवाळी अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत नागपूरलाच होईल असे ठामपणे सांगितले होते. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर नागपूरला येऊन गेले. त्यांनी पाहणी केली आणि बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचा आढावा घेतला. ९५ कोटी रुपये अपेक्षित खर्च काढला. त्यानुसार टेंडर बोलाविण्यात आले आहेत. याच आठवड्यात सर्व कामांचे टेंडर फायनल केले जाणार आहे.