Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur सौंदर्यीकरण, स्वच्छतेत राज्यात अव्वल; पुरस्कारात मिळाले...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत विजेते ठरलेल्या नागपूर महापालिकेला पुरस्कार स्वरूपात 15 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या सरकारी निर्णयान्वये आयोजित शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेकरिता सुंदर जलाशय/पाणीसाठे, सुंदर हिरवे पट्टे/जागा, सुंदर पर्यटन/वारसा स्थळ, सुंदर बाजार/व्यावसायिक ठिकाण या चार बाबींवर मूल्यांकन करण्यात आले. नागपूर महापालिकेद्वारे शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे, शहरातील तलाव, ऐतिहासिक स्थळे, वारसा स्थळे, शहरातील वृक्षआच्छादन असलेली स्थळे यासोबतच स्वच्छतेसंबंधी राबविण्यात येणारी प्रकल्प आदींची माहिती स्पर्धेद्वारे सादर केली. याशिवाय जी-20 शिखर परिषदेच्या अनुषंगाने शहरात करण्यात आलेले सौंदर्यीकरण व निर्माण करण्यात आलेल्या सौंदर्यस्थळांची देखील माहिती राज्य सरकारकडे सादर करण्यात आली.

नागपूर विभागीय छाननी समितीपुढे मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीराम जोशी यांनी नागपूर शहरातील सौंदर्यीकरण कार्याचे सादरीकरण दिले. यानंतर समितीद्वारे माहिती राज्य शासनाकडे पाठविण्यात आली. शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये "अ" व" ब" वर्ग महापालिका गटामध्ये नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर द्वितीय क्रमांक ठाणे महानगरपालिका व तृतीय क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्राप्त केला आहे. नागपूर शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी जी- 20 आंतराष्ट्रीय बैठकीसाठी नागपूर महापालिकेने तब्बल 200 कोटी सौंदर्यीकरणवर खर्च केले होते.