Road
Road Tendernama
विदर्भ

Gadchiroli : आष्टी पुलावर जागोजागी खड्डेच खड्डे; यावर्षीही चिखलातून प्रवासाचे संकट?

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर मागील अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या पुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याबाबत सरकार व प्रशासनाकडून आश्वासित करण्यात आले होते. मात्र, अजूनही खड्डे दुरुस्तीचा मुहूर्त मिळालेला दिसून येत नाही, त्यामुळे नागरिकांना पुलावरून आवागमन करताना पाठसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

वैनगंगा नदी पुलावर मागील अनेक दिवसांपासून जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खडड्यांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी विद्यार्जनाकरिता आष्टी येथील शाळा, महाविद्यालयांत येतात. यातील बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी सायकलने पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करत प्रवास करतात. सायकलस्वार विद्यार्थ्यांना पुलावरील खड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकही विविध कामांसाठी तसेच रुग्णालयात आष्टी येथे येत असतात. त्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे एखादे वाहन नदीपात्रात कोसळण्याचा धोका असतो. खड्ड्यांमुळे पुलावर अपघात होऊन जीव गेल्यास याला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. यानंतर आष्टी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नदीपुलावरच रास्तारोको आंदोलन केले होते.

या आंदोलनाची दखल घेत थातूरमातूर खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, या पुलावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने काही दिवसांतच पुन्हा 'जैसे थे' अवस्था झाली. ही अतिशय गंभीर बाब आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

यावर्षीही चिखलातून प्रवासाचे संकट ?

पुलावरून खड्ड्यांमुळे वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मणका व कमरेचे आजार होत असल्याचे दिसून येते. पुन्हा यावर्षीही पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करण्याची पाळी वाहनचालकांवर येईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवीन पूल होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागू शकते. तोपर्यंत जुन्या पुलाची डागडुजी करण्याची गरज आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे.