Nagpur Vidhan Bhavan
Nagpur Vidhan Bhavan Tendernama
विदर्भ

नागपुरातील ठेकेदार जाम खुश; हिवाळी अधिवेशनाचे कंत्राट 95 कोटींचे

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी ९५ कोटींचा खर्च येणार आहे. बांधकाम विभागाकडून खर्चाचा आराखडा अंतिम करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मागील अधिवेशनाच्या तुलनेत ३० कोटींचा खर्च होणार असल्याने ठेकेदार जाम खुश आहे.

कोरोनामुळे वर्ष २०२० व २०२१ ला हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही. कोरोनामुळेच सर्वच अधिवेशन मुंबईला झाली असली तरी त्याचा कालावधीही कमी होता. नागपुरात होणारे अधिवेशन सहा आठवड्यांचे घेण्याचा करार आहे. परंतु गेल्या काही दशकाचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंना तीन आठवड्यांचे होते. यंदाचे अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून किमान दोन आठवड्यांचे होण्याची अपेक्षा आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचे संकेत दिले आहे. दुसरीकडे प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे. यासाठी विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे सज्ज करण्यात येणार आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसह रंगरंगोटीची कामे करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे रस्त्यांचीही डागडुजी करण्याच येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला. त्यांना खर्चाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम विभागाकडून खर्चाचा आराखडा अंतिम करण्यात आला. बांधकाम, आरोग्य, वीजसह इतर व्यवस्थेवर ९५ कोटींचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. जीएसटी, सीएसआरच्या दरात वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे कामेही वाढणार असून साहित्यही खराब झाले नव्याने खरेदी करावे लागणार असल्याने खर्चात वाढ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मागील अधिवेशन काळात ६५ कोटींचा खर्च आला होता. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी निधीची काळजी न करता योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या.