Bhandara
Bhandara Tendernama
विदर्भ

Bhandara : 3390 हेक्टर क्षमतेच्या 'या' सिंचन योजनेला अखेर हिरवा झेंडा

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : लाभापासून वंचित असलेल्या भंडारा व लाखनी तालुक्यातील गावांचे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून आमदार नरेंद्र भोंडेकर आणि करचखेडा संघर्ष समितीकडून मागणी सुरू होती. त्याची दखल घेऊन धारगाव उपसा सिंचन योजना दोन भागांत विभागण्यात आली असून, पहिल्या भागाला मंजुरी देण्यात आली आहे.

पाठपुराव्याला आले यश : 

या योजनेच्या मंजुरीसाठी पाठपुराव्यानंतर विदर्भ पाटबंधारे विभागाला याचा प्रस्ताव सादर करण्यास जलसंपदा विभागाच्या अपर सचिवांकडून सांगण्यात आले होते. भंडारा तालुक्यातील उसरागोंदी गावाजवळील वैनगंगा नदीला मिळणाऱ्या नाल्यावर ही योजना उभारण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता देऊन भाग एकला मंजुरी दिली. या योजनेमुळे भंडारा तालुक्यातील 16 आणि लाखनी तालुक्यातील 6 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे.

प्रकल्पासाठी लागणार 18.56 हेक्टर जमीन : 

या प्रकल्पाच्या पहिल्या भागासाठी 18.56 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी खाजगी जमीन 10.83 हेक्टर, शासकीय जमीन 0.23 हेक्टर आणि 7.50 हेक्टर वन जमीन संपादित करावी लागणार आहे.

पहिला भाग उसरागोंदी गावाजवळील नाल्यावर :

भाग एक असलेली ही योजना भंडारा तालुक्यातील उसरागोंदी गावाजवळ वैनगंगा नदीला मिळणाऱ्या नाल्यावर प्रस्तावित आहे. धारगाव उपसा सिंचन योजोचा समावेश थेट गोसीखुर्द प्रकल्पामध्ये करण्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे ही योजना गोसीखुर्द प्रकल्पाचा भाग म्हणून न घेता स्वतंत्र योजना म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी भाग एक आणि दोन अशी विभागणी करून स्वतंत्र प्रशासकीय मान्यता घेतली गेली आहे.