NIT
NIT Tendernama
विदर्भ

Good News: 'त्या' 65 ले-आऊटबाबत एनआयटीचा मोठा निर्णय...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने (NIT) गुंठेवारी परिसरात नियमित करवसुली करून 65 लेआउट विकसित केले आहेत. याठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यानंतर हे 65 ले-आऊट ओपन स्पेससह नागपूर महापालिकेकडे (NMC) हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने या निर्णयाला मान्यता दिली, त्यानंतर आता या ले-आऊटमध्ये सुविधा देण्याचे काम महापालिका करणार आहे. या बैठकीत सक्करदरा येथील बॉलिवूड सेंटर पॉइंट येथे व्यापारी संकुल, क्रीडा संकुल, एक सभागृह आणि शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मानेवाडा येथील ई-लायब्ररीबाबत येणाऱ्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याच्या सूचना एनआयटीच्या अध्यक्षांनी दिल्या आहेत. यावेळी एनआयटीचे विश्वस्त मोहन मते, संदीप इटकेलवार उपस्थित होते. 

बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. एनआयटीच्या सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) यांना सातव्या वेतन आयोगातील 3 लाभांच्या सुधारित सेवेअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय लाभ म्हणून मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे उच्च न्यायालय, जिल्हास्तरीय न्यायालये आणि एनआयटी पॅनेलवरील इतर न्यायालयांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणाऱ्या वकिलांच्या नियुक्तीला दोन वर्षांची वाढ देण्यात आली आहे.

याशिवाय विविध ई-टेंडर अंतर्गत मागविण्यात आलेल्या 50.08 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये 1900 ले-आऊट निधी अंतर्गत मौजा चिखली (खुर्द) येथील 96.23 लाख सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामासह विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

दक्षिण नागपुरात 24 कोटींचे सिमेंट रस्ते

NIT कडून दक्षिण नागपुरात 24 कोटी 23 लाख रुपयांचे सिमेंट रस्ते तयार करण्यात येणार आहेत. नऊ मीटर रुंद या रस्त्यांच्या कामालाही मंजुरी देण्यात आली. चिखली येथे 86 लाखांचे सिमेंट रस्ते तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय पूर्व नागपुरात मिनीमातानगर, पारडी, हिवरीनगरात ड्रेनेज लाईन, सिमेंट रोड तयार करण्यात येणार आहेत.