Pramod Sawant, Nitin Gadkari
Pramod Sawant, Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

गडकरींनी नागपुरात केलेल्या कामाची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भुरळ

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) ः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलेल्या उपराजधानीतील विकास कामांची अनेकांना भुरळ घातली. यात आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचीही भर पडली. डॉ. सावंत यांनी आज दुपारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विकास कामांवर चर्चा केली.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रेशिमबागेतील सुरेश भट सभागृहात आयोजित आयुर्वेद पर्व या कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी वर्धा मार्गावरील केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान गाठले. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवालही होते. गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गडकरी यांना नागपुरातील विकास कामाबाबत उत्सुकतेने विचारणा केली. गडकरी यांच्या निवासस्थानाच्या टेरेसवरून वर्धा मार्गावरील डबल डेकर पूल स्पष्ट दिसतो. गडकरी यांनी डॉ. प्रमोद सावंत यांना मेट्रो तसेच डबल डेकर पूलाबाबत माहिती दिली. एवढेच नव्हे गड्डीगोदाम येथील चार मजली मेट्रो पूलाबाबतही गडकरी यांनी त्यांना सांगितले. डॉ. सावंत यांनी शहरातील विकास कामांचे कौतुक केले. डॉ. सावंत यांंनी गडकरी यांना गोव्यातील पर्यटनाबाबत माहिती दिली.