Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

नितीन गडकरींचा 'हा' प्रकल्प नागपूरसाठी ठरणार वरदान; कारण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने केंद्र सरकारने मान्यता दिल्याने शहराच्या स्वच्छतेत भर पडणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील १ लाख ३१ हजार घरांना सिवेज नेटवर्कमध्ये जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिवेज लाईन तुंबणे, त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, रस्त्यांवरील घाण पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मंजुरी देत केंद्रीय मंत्रिमंडळाने नागपूरकरांना भेट दिली. १९२७ कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठपुरावा केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात ५०० किमीच्या सिवेज लाईनचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. नाग नदीतील पाणी स्वच्छ होईल, असा दावा केला जात आहे. नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या प्रकल्पाची रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी केली. येत्या सहा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी केंद्र, राज्य सरकारसोबत महापालिकाही आर्थिक योगदान देणार आहे.

या प्रकल्पाचा अहवाल जपानच्या जिका या एजन्सीने तयार केला होता. शहरात सध्या जुन्या जीर्ण सिवेज लाईन असून त्या वारंवार तुंबत आहेत. अनेक ठिकाणी चेंबर फुटले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर घाण पाणी जमा होऊन नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. एवढेच नव्हे सिवेज लाईन तुंबल्यामुळे घाण परत घरात येत असल्याने शहरातील अनेक भागातील नागरिक त्रस्त आहेत. या प्रकल्पामुळे रस्त्यांवर येणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

सिवेज लाईन बदलणार
उत्तर झोनमध्ये २४७.९ किमी, तर मध्य झोनमध्ये २११.६०‍ किमी सिवेज लाईन बदलण्यात येणार आहे. प्रकल्पामध्ये १०७ ‘मॅनहोल’ वळण राहतील. प्रकल्पांतर्गत नवे ९२ एमएलडी क्षमतेचे एसटीपी तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पानंतर नाग नदीसह पिवळी नदी व बोर नाल्यातील पाण्याची गुणवत्ता सुधारणार आहे.