Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

गडकरींनी कुलूप उघडून 'असा' संपवला नागपूरकरांचा 18 वर्षांचा वनवास..

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : उद्‍घाटन कोणाच्या हस्ते करावे या वादात अडकेलल्या कन्हान नदीवरच्या पुलाचे कुलूप अखेर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उघडले. त्यामुळे तब्बल आठ वर्षानंतर या पुलावरून अधिकृत वाहतूक सुरू झाली आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. कन्हान नदीवर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी व्यवसायाच्या वाहतुकीच्या दृष्टीने १८७० मध्ये पुलाची उभारणी केली होती. तेव्हा १२ लाख ५० हजारांच्या खर्चाने दगडांचा वापर करून पुलाची निर्मिती केलेली होत. पुलाने १५२ वर्षे पूर्ण केली आहेत. मध्यंतरी झालेल्या ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे २०१४ साली पर्यायी पुलाचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय (रस्ते व वाहतूक) मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. पूल तीन वर्षांत पूर्ण केला जाणार होता.

मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे पुलाचे निर्माण कार्य संथ गतीने झाले. अखेर नवीन पुलचे काम पूर्ण करण्याचे निर्देश माजी मंत्री सुनील केदार यांनी प्रशासनाला देऊन नागरिकांच्या रहदारीसाठी लवकरच पूल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यामुळे पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा लांबला होता. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुलासंदर्भात निवेदन देऊन उद्घाटन करण्याची मागणी करण्यात आली होती.

दोन वर्षांपूर्वीच हा पूल तयार झाला होता. मात्र वादामुळे नागरिकांना कालबाह्य पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन जावा लागत होते. जागोजागी खड्डे पडल्याने रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या रुग्णाला देखील मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्यामुळे नागरिकांनी नवीन पुलाचे लागलेले बेरिकेड्‍स काढून रहदारी सुरू केली होती. त्यामुळे पुलावर बॅरिकेड्‍स टाकून त्यास कुलूप लावून ठेवण्यात आले होते.