Gadchiroli
Gadchiroli Tendernama
विदर्भ

Gadchiroli : हे काय? ठराव घेतला पण जिल्हा परिषदेकडून कामेच मंजूर नाही झाली

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली ग्रामपंचायत खुटगावअंतर्गत खुटगाव, पलखेडा व पांढरसडा येथील प्रस्तावित विकास कामांना मंजुरी मिळण्यासाठी 22 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले; परंतु ठरावात घेतलेली कामे अजूनही मंजूर झाली नाहीत. ती कामे लवकर मंजूर करावी, अशी मागणी खुटगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

खुटगाव येथे सरपंच मोहन गावळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली होती. या ग्रामसभेत 2023- 2024 या वर्षात विविध विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा करून पांढरसडा, खुटगाव व पलखेडा येथे विविध विकासकामे ठरावात घेण्यात आली. ती कामे लवकर मार्गी लावावी, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे पांढरसडाचे पोलिस पाटील महेंद्र मडावी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात त्यांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

हे विकासकार्य आहेत पेंडिंग :

पलखेडा (मेंढाटोला फाटा ते  पलखेडा) रस्त्याचे डांबरीकरण करणे व मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, पलखेडा तें मिचटोला, पांढरसडा, पलखेडा ते गट्टेपायली, पलखेडा ते महावाडा, पलखेडा ते मिचटोला रस्त्याचे खडीकरण करणे, आत्माराम उसेंडी यांच्या शेताजवळील पूल पूल मंजूर करणे. जि.प.शाळा पलखेडा ते मिचटोला रोडपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करावा. पांढरसडा येथील मामा तलावाजवळील सांडव्यावर पूल बांधावे, अंतर्गत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, पांढरसडा ते कटेझरी रस्त्याचे खडीकरण, स्वागत गेट बांधकाम करणे, मामा तलावाला संरक्षक भिंत बांधावी, हनुमान मंदिर टेकडी व मामा तलावाचे सौंदर्गीकरण करणे, पांढरसडा येथे दोन कुर्मा घर बांधकाम करणे, पांढरसडा येथील तलावाची नहर व पाटदुरुस्ती करावी, खुटगाव ते मिचटोला रस्ता खडीकरण, मिचटोला ते खुटगाव पाच लहान मोरी बांधकाम व एका मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर करणे, माता मंदिराजवळील मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, मामा तलावाचे खोलीकरण, आदी कामे लवकर मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली.